
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरू होण्यास अद्याप बराच अवकाश असले तरी वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज केरोन पोलार्ड याने आतापासून जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. कॅरेबियन प्रीमिअर लीग (सीपीएल) स्पर्धेत पोलार्डने 28 चेंडूत 72 धावांची तुफानी खेळी केली. पोलार्डच्या या तुफानी खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघ खुशीत आहे.
सीपीएलमध्ये त्रिनबागो नाइट राइडर्स आणि बारबाडोस ट्राइडेंट्स यांच्यात क्विंस पार्क ओव्हल मैदानावर सामना रंगला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बारबाडोस ट्राइडेंट्सने 20 षटकात 7 विकेट्स गमावून 148 धावा केल्या. जॉनसन चार्ल्स याने 47 आणि काइल मेयर्स याने 42 धावांचे योगदान दिले.
विजयासाठी 149 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या त्रिनबागो नाइट राइडर्सने 62 धावांमध्ये 5 विकेट्स गमावल्या. यानंतर सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या पोलार्डने मोर्चा सांभाळला आणि विरोधी संघाला आपल्या बॅटचा तडाखा दिला. पोलार्डने अवघ्या 28 चेंडूत 9 षटकार आणि 2 चौकरांच्या आतिषबाजीसह 72 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीच्या बळावर त्रिनबागो नाइट राइडर्स 2 विकेट्स राखून विजय मिळवला.

























































