दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेचे पथक स्थापन

27


सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेवरील कांजुरमार्ग ते कुर्ला स्थानकादरम्यान लोकलवर दगडफेकीच्या घटना वाढत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी रेल्वे राखीव पोलीस दलातील 24 जणांचे पथक मध्य रेल्वेने स्थापन केले आहे. हे पथक एक किलोमीटरच्या अंतरावर गस्त घालणार आहे. तसेच या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही लावण्यासह स्थानिकांची मदतही घेण्यात येणार आहे.

एप्रिल ते 8 जुलैदरम्यान या मार्गावर अशा प्रकारच्या 8 घटना घडल्याची नोंद आहे. फटका गँगच्या कारवायांना पायबंद घालण्यात आल्याने दगडफेकीच्या घटना वाढल्याचे जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अशा घटना घडवून फोन चोरी, फटका गँगच्या कारवाया आणि समाजविघातक कारवायांकडून पोलिसांचे लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे अधिकारी म्हणाले. या मार्गावरील कुर्ला ते कांजुरमार्गदरम्यान फटका गँगचा प्रभाव होता. फेब्रुवारी महिन्यात फोन चोरीच्या आठ प्रकरणांची नोंद झाली होती. तर जूनमध्ये हा आकडा दोनपर्यंत खाली आला आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी आणि पकडले जाऊ नये, यासाठी फटका गँगकडून वेगवेगळ्या कृप्त्या वापरण्यात येतात. तसेच आता त्यांनी दगडफेकीसारख्या घटना सुरू केल्याचे आरपीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी आणि गर्दीच्यावेळी लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांना फटका गँगकडून लक्ष्य करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दगडफेकीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पोलीस आणि जीआरपीशी चर्चा करण्यात येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी त्यांची मदत घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनीही अशा घटनांबाबत जागरुक राहावे यासाठी मोहीम राबवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त के.के. अश्रफ यांनी सांगितले. त्याचप्रमाणे यासाठी स्थानिकांचीही मदत घेण्यात येणार आहे. लोकलच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रवाशांवर खूप वेगाने दगड आदळतो. त्यामुळे ती व्यक्ती पडून त्या गंभीर जखमी होण्याची भीती असते. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या