अंत्यसंस्कार करणाऱ्यांना दोन महिने पगाराची कवडीही नाही, मीरा रोडमधील स्मशानभूमीचे कर्मचारी तिरडीवरच झोपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत येताच तेथील कर्मचारी स्वतः सर्व तयारी करतात. सरणावर लाकडे रचण्यापासून ते अस्थी गोळा करण्यापर्यंत ते मदत करत असतात. इमानेइतबारे हे काम करणाऱ्या मीरा रोडच्या मुक्तिधाम स्मशानभूमीमधील कर्मचाऱ्यांवरच तिरडीवर झोपण्याची वेळ आली. अंत्यसंस्कारासाठी मदत करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून पगाराची कवडीही न मिळाल्याने त्यांनी तिरडीवर झोपून अनोखे आंदोलन केले. लवकरात लवकर पगार मिळावा अन्यथा याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

मीरा-भाईंदर शहरात पालिकेच्या एकूण 16 स्मशानभूमी आणि दफनभूमी असून येथे सेवा देण्यासाठी पालिकेने कंत्राटी पद्धतीवर 58 कामगारांची नियुक्ती केली आहे. या कामांचा ठेका दोन वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने त्यांच्यावर ‘तिरडी आंदोलन’ करण्याची वेळ आली.

तरीही कर्तव्य पार पाडले

मीरा रोडच्या मुक्तिधाम स्मशानभूमीतील प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचे पगारासाठी आंदोलन सुरू असतानाच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह आला होता. पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी सुरू होती. तरीही आंदोलनकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे आपले कर्तव्य पार पाडले.