
पायाला दुखापत झालेली असताना ही मैदानात उतरून झुंजार खेळ करणाऱया लढवय्या ऋषभ पंतवर अवघं जग फिदा झालेय. सारेच पंतला सॅल्यूट ठोकत असताना इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉवलीनेही पंतच्या खेळीचे कौतुक केलेय. पंत हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. दुखापत झालेली असताना एका पायावर फलंदाजी करणे अत्यंत कठीण असून ते खूप कमी फलंदाजांना शक्य झाले आहे, अशा शब्दांत क्रॉवलीने पंतच्या खेळीचा सन्मान केला आहे. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या दिवशीच यष्टिरक्षक ऋषभ पंत याच्या पायावर चेंडू आदळल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडून जावे लागले. गंभीर दुखापत असल्याने पंत सामन्यात पुन्हा खेळू शकणार का नाही? यावर चर्चा सुरू असतानाच ऋषभ दुसऱ्या दिवशी लंगडत फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. त्याच्या खेळीचे अवघ्या जगाने कौतुक केलेय.