
ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटीत हिंदुस्थानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाचा दुसरा डाव 36 धावांमध्ये गडगडल्यानंतर चोहोबाजूंनी टीकेची झोड उडू लागली. गेल्या दोन दिवसांमध्ये मात्र काही मीडियामधून मुंबईकर पृथ्वी शॉला टार्गेट करण्यात येऊ लागले आहे. दुसऱया कसोटीमधून या युवा फलंदाजाला संघाबाहेर ठेवण्यात यावे अशाप्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. अशाप्रकारचे वृत्त प्रसिद्ध करताना यावेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये फक्त एकच खेळाडू अपयशासाठी कसा काय दोषी ठरू शकतो? शिवाय कर्णधार विराट कोहलीचे अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे मुकाबला केलेला नाही. त्यामुळे अॅडलेडमधील पराभवाला एकटय़ा पृथ्वी शॉला टीकेचा धनी ठरवणे योग्य नाही. याप्रसंगी दैनिक ‘सामना’ने या प्रकरणावर टाकलेला दृष्टिक्षेप…
विराट कोहलीचे अर्धशतक वगळता सर्वांचीच हाराकिरी
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हिंदुस्थानचा दुसरा डाव 36 धावांमध्ये गारद करून अॅडलेड कसोटीत विजयाच्या दिशेने कूच केली. त्यानंतर दोन गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली. या कसोटीच्या हिंदुस्थानच्या दोन्ही डावांवर नजर टाकल्यास दिसून येईल की, कर्णधार विराट कोहलीच्या पहिल्या डावातील 74 धावा वगळता एकाही फलंदाजाला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे आव्हान थोपवून लावता आलेले नाही. मात्र या कसोटीतील पराभवाला एकटय़ा पृथ्वी शॉलाच जबाबदार धरत आहेत. हे खरे तर सांघिक अपयश आहे. टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने याची जबाबदारी स्वीकारायला हवी.
गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता
अॅडलेड येथील कसोटी सामना डे नाईट होता. शिवाय ही कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात आली होती. हिंदुस्थानचा संघ पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात डे नाईट कसोटी सामना खेळला. त्यामुळे या संघातील प्रत्येक खेळाडूला ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूने खेळण्याचा अनुभव नव्हता. हा चेंडू जास्त प्रमाणात स्विंग होतो. त्यामुळे फलंदाजांना खेळपट्टी, वातावरण व चेंडूची दिशा, स्वींग या सर्वांचा अंदाज घेणे थोडे कठीण जाते. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांसारखे अनुभवी खेळाडू अपयशी ठरले. तर मग पृथ्वी शॉसारख्या युवा खेळाडूला दोषी ठरवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्नही यावेळी उभा राहत आहे.
पृथ्वीच्या खेळात परिपक्वता येईल -दिलीप वेंगसरकर
पृथ्वी शॉ हा अजून लहान आहे. तो जसजसे सामने खेळत जाईल तसे त्याच्या खेळामध्ये सुधारणा होत जाईल. याच कालावधीत फलंदाजीचे फुटेज पाहून स्वतःच्या तंत्रात काय चूक होतेय हेही त्याला समजू शकेल. त्यामुळे त्याच्या खेळात आणखी परिपक्वता येईल, असे मत दिलीप वेंगसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
युवा मुंबईकर बळीचा बकरा का? – आकाश चोप्रा
हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू व समालोचक आकाश चोप्रा याने या प्रकरणावर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, अॅडलेड कसोटीत हिंदुस्थानच्या सर्वच क्रिकेटपटूंनी सुमार खेळ केला. फलंदाज सपशेल फ्लॉप ठरले. पृथ्वी शॉसोबत सलामीवीर मयांक अग्रवाललाही निराशेचा सामना करावा लागला. मात्र यानंतरही फक्त युवा मुंबईकर पृथ्वी शॉला दुसऱया कसोटीसाठी संघाबाहेर ठेवल्यास त्याला बळीचा बकरा केल्यासारखं होईल.
फलंदाजी प्रशिक्षक काय करताहेत?
बीसीसीआय हे जगातील धनाढय़ बोर्ड म्हणून ओळखले जाते. त्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा सपोर्ट स्टाफही तेवढाच मोठा आहे. टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी रवी शास्त्री यांच्यावर आहे. भरत अरुण यांच्या खांद्यावर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. रामक्रिशनन श्रीधर क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहताहेत. विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पृथ्वी शॉ पहिल्या कसोटीत दोन्ही डावांमध्ये त्रिफळाचीत झाला. बॅट आणि पॅडमध्ये अंतर राहिल्यामुळे तो दोन्ही वेळेला बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने कसोटीच्या आधीच पृथ्वी शॉच्या फलंदाजी तंत्राबाबत भविष्यवाणी केली. आणि त्याच पद्धतीने दोन्ही डावांत तो बाद झाला. परदेशी प्रशिक्षकांना हिंदुस्थानी फलंदाजांच्या उणीवा माहीत असतानाच हिंदुस्थानी प्रशिक्षक काय करताहेत? विक्रम राठोड यांनी कसोटी मालिकेआधीच पृथ्वी शॉच्या फलंदाजी तंत्रामधील त्रुटी दूर करायला हव्यात. पण प्रत्यक्षात असे झाले नाही. ही खेदजनक बाब.
पहिल्या कसोटीतील हिंदुस्थानी फलंदाजांच्या धावा
मयांक अग्रवाल 17 आणि 9
पृथ्वी शॉ 0 व 4
चेतेश्वर पुजारा 43 व 0
विराट कोहली 74 व 4
अजिंक्य रहाणे 42 व 0
हनुमा विहारी 16 व 8
रिद्धीमान साहा 9 व 4





























































