
वन डे क्रिकेट मालिकेत पराभूत झालेला हिंदुस्थानी क्रिकेट संघ टी-20 मालिका जिंकण्याच्या उंबरठय़ावर उभा आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या दुसरा टी-20 सामना रंगणार असून यावेळी विराट कोहलीची सेना ही लढत जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी रेडी झाली असेलच. यजमान ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र उद्याची लढत जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्न करताना दिसेल. बघूया उद्याच्या लढतीत कोणता संघ बाजी मारतोय ते…
जाडेजाऐवजी शार्दुल ठाकूर
अखेरचा वन डे सामना व पहिला टी-20 सामना गाजवणारा रवींद्र जाडेजा उर्वरीत टी-20 मालिकेतील लढतींना मुकणार आहे. पहिल्या टी-20 लढतीत अखेरच्या षटकात फलंदाजी करीत असताना रवींद्र जाडेजाच्या हेल्मेटवर चेंडू लागला. आता बीसीसीआयची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. मात्र तो या मालिकेत खेळू शकणार नाही अशी माहिती त्यांच्याकडून यावेळी देण्यात आली. त्याच्याऐवजी हिंदुस्थानच्या टी-20 संघात मुंबईकर खेळाडू शार्दुल ठाकूरची निवड करण्यात आली आहे.
मनीष पांडे की श्रेयस अय्यर
पहिल्या टी-20 लढतीत हिंदुस्थानसाठी फलंदाजी विभागात लोकेश राहुल व रवींद्र जाडेजा वगळता एकालाही ठसा उमटवता आला नाही. मनीष पांडेला या लढतीत संधी देण्यात आली होती, पण त्याला याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संघात स्थान देण्यात आल्यास आश्चर्य वाटणार नाही. संजू सॅमसनलाही आपला खेळ उंचावावा लागणार आहे. गोलंदाजी विभागात टी. नटराजन, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. दीपक चहरला वगळण्यात येईल असे वाटत नाही. पण मोहम्मद शमी व जसप्रीत बुमराह यांच्यापैकी एकाला संघात स्थान देण्यात येईल आणि एकाला विश्रांती देण्यात येईल असे नक्कीच वाटते. हिंदुस्थानचा संघ पहिल्या लढतीत जिंकलाय. त्यामुळे उद्याच्या लढतीत जास्त बदल होतील याची शक्यता कमीच आहे.
दुखापतीमुळे चिंता
यजमान ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाची दुखापतीमुळे चिंता वाढली आहे. डेव्हिड वॉर्नर, ऍश्टन ऍगर यांना दुखापतीमुळे या मालिकेमधून माघार घ्यावी लागली असतानाच कर्णधार ऍरोन फिंचलाही दुखापत झाली आहे. कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघासाठी खेळायला गेल्यामुळे त्याच्याऐवजी फिरकी गोलंदाज नॅथन लायनला संघात स्थान देण्यात आले आहे. ऍरोन फिंचने उद्याच्या लढतीमधून माघार घेतल्यास स्टीवन स्मिथकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सोपवण्यात येऊ शकते.
या खेळपट्टीत दडलंय काय…
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या सिडनी येथे दुसरा टी-20 सामना रंगणार आहे. या दोन संघांमध्ये पहिल्या दोन वन डे लढती येथेच खेळवण्यात आल्या होत्या. दोन्ही लढतींत धावांचा पाऊस पडला होता. उद्याही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. सिडनी येथील लढतीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवले होते. तसेच कॅनबेरा येथील लढतीत हिंदुस्थानने बाजी मारली होती.
आकडेवारीवर एक नजर
- मोयसेस हेन्रीक्स याने पहिल्या टी-20 लढतीत पूर्ण म्हणजेच 4 षटके टाकली. 2017 फेब्रुवारीनंतर त्याने आपला गोलंदाजी कोटा पूर्ण केला.
- मागील दहा टी-20 लढतीत हिंदुस्थानी संघाला पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. यामधील एक लढत रद्द झालेली आहे. तसेच दोन लढतींमध्ये सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवण्यात टीम इंडियाला यश लाभले आहे.
- दोन वर्षांपूर्वी सिडनी येथील स्टेडियममध्ये 165 धावांचा पाठलाग करीत टीम इंडियाने मालिका बरोबरीत राखली होती.





























































