12 वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर वन डे होणार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जयेंद्र लोंढे । मुंबई

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), ब्रेबॉर्न स्टेडियम तब्बल 12 वर्षांनंतर वन डे सामन्याच्या आयोजनासाठी सज्ज झाले आहे. हिंदुस्थान व वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 29 ऑक्टोबरला या सर्वात जुन्या स्टेडियमवर वन डे लढतीचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयने 17 दिवस बाकी असताना ब्रेबॉर्नला आंतरराष्ट्रीय सामन्याच्या आयोजनाची संधी दिली. यावेळी येथील व्यवस्थापनाने कमी दिवसांच्या अवधीतही आंतरराष्ट्रीय सामन्याची तयारी पूर्ण केली. याआधी 2006 साली ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये ब्रेबॉर्न स्टेडियमवर अखेरचा वन डे सामना झाला होता.

क्रिकेटप्रेमींसाठी दोन एलईडींची सुविधा
ब्रेबॉर्न स्टेडियमवर हिंदुस्थान-वेस्ट इंडीज सामना पाहण्यासाठी येणाऱया क्रिकेटप्रेमींना दोन एलईडीवर धावफलक व इतर बाबी पाहता येणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्याला साजेसे असे स्टेडियम यावेळी सजवण्यात आले आहे.

हाऊसफुल्ल होणार
वन डे सामन्यासाठी आठशे रुपयांपासून 25 हजार रुपयांपर्यत तिकीट दर ठेवण्यात आले आहेत. सामन्याला अद्याप काही दिवस बाकी आहेत. तिसरा सामना पुण्याला होणार आहे. त्यामुळे ब्रेबॉर्नवरील सामना हाऊसफुल्ल होईल, असा विश्वास ब्रेबॉर्नचे संजय जयवंत यांनी यावेळी बोलून दाखवला.

आयसीसी, बीसीसीआय नियमानुसारच खेळपट्टी बनवलीय
ब्रेबॉर्न स्टेडियमची खेळपट्टी ही आयसीसी व बीसीसीआय नियमानुसारच बनवण्यात आलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना आऊटफिल्डचाही कोणताही त्रास होणार नाही. अव्वल दर्जाचे आऊटफिल्ड बनवण्यात आले आहे.

सर्व खर्च आयोजकांचाच
बीसीसीआयने ब्रेबॉर्नला सामन्याच्या आयोजनाची संधी दिली असली तरी मुंबई क्रिकेट असोसिएशनप्रमाणे त्यांना बीसीसीआयकडून कोणतीही रक्कम मिळत नाही. त्यामुळे टेलीव्हीजनवरील प्रक्षेपण हक्क वगळता सर्व खर्च ब्रेबॉर्न स्टेडियम व्यवस्थापनाकडून करण्यात आला. यामध्ये तिकिटांपासून, सीमारेषेवरील जाहिरातीपर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे.