सौराष्ट्र पहिल्यांदाच रणजी चॅम्पियन; 30 वर्षांनंतरही बंगाल जेतेपदापासून दूरच

399

गेल्या आठ वर्षांमध्ये चार वेळा अंतिम फेरीत प्रवेश… तीन वेळा उपविजेतेपद… अखेर 2020 मध्ये अजिंक्यपदावर मोहोर… ही स्टोरी सौराष्ट्राच्या क्रिकेट संघाची. 2012 आणि 2015 सालामध्ये मुंबईकडून आणि गेल्या मोसमात विदर्भाकडून हार सहन करावी लागल्यामुळे सौराष्ट्राच्या संघाला जेतेपदापासून वंचित राहावे लागले होते. अखेर या वर्षी जयदेव उनाडकटच्या सौराष्ट्राने बंगालविरुद्धच्या अंतिम लढतीत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर रणजी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. हे त्यांचे पहिलेच जेतेपद. पहिल्या डावात 106 धावांची मोलाची खेळी साकारणाऱया अर्पित वसावडाची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली.

याआधी 1936 साली नवानगर तर 1943 साली पश्चिम हिंदुस्थान संघाने रणजी जेतेपद जिंकले होते. कालांतराने सौराष्ट्र नावाने हा संघ मैदानात उतरू लागला. तिथपासून त्यांना रणजी चॅम्पियन होता आले नव्हते. बंगालला मात्र 1989 सालानंतर म्हणजेच तब्बल 30 वर्षांनंतरही चॅम्पियन होता आले नाही. याआधी दोन वेळा त्यांनी रणजी विजेते होण्याचा मान संपादन केला आहे.

पहिला डाव 381 मध्ये आटोपला

बंगालने 6 बाद 354 या धावसंख्येवरून अखेरच्या दिवशी पुढे खेळायला सुरुवात केली, पण त्यांचा पहिल्या 381 धावांमध्येच आटोपला. जयदेव उनाडकटने अनुस्तुप मजुमदार याला 63 धावांवर बाद करीत मोठा अडसर दूर केला. त्यानंतर अर्णब नंदी याने नाबाद 40 धावा करीत थोडाफार प्रतिकार केला. पण इतर फलंदाजांच्या अपयशामुळे बंगालला पहिल्या डावात आघाडी घेता आली नाही. यामुळे सौराष्ट्राला पहिल्या डावात 44 धावांची आघाडी घेता आली. ही आघाडी जेतेपदासाठी पुरेशी ठरली. सौराष्ट्राकडून धमेंद्र जाडेजाने 3, प्रेरक मांकड व जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

करंडक घरी आला

हिंदुस्थानातील रणजी या मानाच्या स्पर्धेला रणजीतसिंगजी जाडेजा यांचे नाव देण्यात आले आहे. नवानगरचे महाराज म्हणून ओळखले जाणारे रणजीतसिंगजी यांचा जन्म 1872 साली काठियावार येथे झाला. तसेच त्यांचा मृत्यू जामनगर, नवानगर येथे 1933 साली झाला. सौराष्ट्राने रणजी करंडक जिंकल्यानंतर प्रतिष्ठsची ट्रॉफी घरी आली असल्याचे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून सोशल साइटवर प्रसिद्ध करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

  • सौराष्ट्र – पहिला डाव सर्व बाद 425 धावा
  • बंगाल –  पहिला डाव सर्व बाद 381 धावा
  • सौराष्ट्र – दुसरा डाव 4 बाद 105 धावा
आपली प्रतिक्रिया द्या