आता 24 संघ? आगामी टी-20 वर्ल्ड कप

क्रिकेटने शंभर वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आगामी 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन केले आहे. या पुनरागमनामुळे क्रिकेटची कीर्ती अवघ्या क्रीडाविश्वात सुस्साट वेगाने पसरली जाणार यात वाद नाही. त्यामुळे आयसीसीने गुरुवारपासून सिंगापूरमध्ये होणाऱ्या चारदिवसीय वार्षिक सर्वसाधारण बैठकीत टी-20 वर्ल्ड कपमध्ये 24 संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहेत. तसेच कसोटी क्रिकेट दोन श्रेणींमध्ये खेळविण्याबाबतही अंतिम निर्णय या बैठकीतच घेतला जाणार आहे.

ऑलिम्पिक पुनरागमनानंतर क्रिकेट विश्वातील टी-20 क्रिकेटचे संघ वाढावेत म्हणून आणखी नव्या सदस्यांना सामावून घेण्याचा विचार आयसीसीने सुरू केला आहे. काही देशांची नावे अंतिमही करण्यात आली आहे. त्याचबरोबर 2028 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 24 क्रिकेट संघांना स्थान देण्याबाबतही चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांकडून कळले आहे. 2026 साली हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 संघच खेळणार असले तरी आगामी स्पर्धेत ती संख्या चारने वाढविण्याची मानसिक तयारी आयसीसीने केली आहे.

कसोटी क्रिकेट दोन श्रेणींमध्ये

कसोटी क्रिकेटमध्ये दुबळय़ा संघांना अधिकाधिक कसोटी खेळता यावेत म्हणून 2027 नंतर कसोटी क्रिकेट चार दिवसांवर आणले जाणार आहे. मात्र हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेसारखे संघ एकमेकांशी पाचदिवसीयच कसोटी खेळतील. सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या मोसमाची सुरुवात झाली असून यात कोणताही बदल केला जाणार नाही. मात्र त्यानंतर श्रीलंका, बांगलादेश, वेस्ट इंडीज, झिम्बाब्वे यांच्याविरुद्धचे कसोटी सामने चार दिवसांचे केले जाण्याची शक्यता आहे.