हिंदुस्थानसमोर सलामीलाच ऑस्टेलियाचे आव्हान; महिलांचा टी-20 वर्ल्ड कप आजपासून

388

ऑस्ट्रेलियात शुक्रवार, 21 फेब्रुवारीपासून महिला टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपचा बिगुल वाजणार आहे. 2018 सालच्या वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने हिंदुस्थानी महिला संघाचे जगज्जेतेपदाचे स्वप्न भंगले होते. गतवेळी अधुरे राहिलेले मिशन यंदा पूर्ण करण्याच्या इराद्याने हिंदुस्थानी संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणार आहे. हिंदुस्थानी महिला उद्या चार वेळच्या जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानास प्रारंभ करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या तिरंगी मालिकेत हिंदुस्थानी संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारून चांगली कामगिरी केली. या मालिकेत हिंदुस्थानने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध 1-1 सामना जिंकला, तर 1-1 सामना गमावला होता. अंतिम लढतीत हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियाकडून हार पत्करावी लागली. मात्र तरीही टी-20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानी महिलांनी जबरदस्त तयारी केली आहे हे दिसून आले आहे.

हिंदुस्थानच्या संघाच्या साखळी लढती

  • 21 फेब्रुवारी – हिंदुस्थान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
  • 24 फेब्रुवारी – हिंदुस्थान विरुद्ध बांगलादेश
  • 27 फेब्रुवारी – हिंदुस्थान विरुद्ध न्यूझीलंड
  • 29 फेब्रुवारी – हिंदुस्थान विरुद्ध श्रीलंका

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत झालेल्या सहापैकी चार वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावलेले आहे. यावेळीही हिंदुस्थानच्या मार्गात बलाढय़ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांचा अडसर असणार आहे. मोठय़ा संघांना हरविण्यासाठी हिंदुस्थानच्या मधल्या फळीतील आणि तळाच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. संघ व्यवस्थापनाने यात लक्ष घालायला हवे. हिंदुस्थानी संघ ‘अ’ गटात असून यात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघांचा समाकेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या