
क्रिकेट विश्वचषकातील (Cricket World Cup 2023) अंतिम सामन्यापेक्षाही रंगतदार सामना असे ज्याचे वर्णन केले जाते तो हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) मुकाबला शनिवारी म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियम या महामुकाबल्यासाठी सज्ज झाले आहे. हा सामना कोण जिंकणार याची मोठी उत्कंठा असून क्रिकेटरसिक या सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. बलाढ्य ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर अफगाणिस्थानला धूळ चारणारा यजमान हिंदुस्थानी संघ हा चांगल्या फॉर्मात दिसतो आहे.
पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात जो संघ पहिल्या दोन सामन्यांसाठी होता तो कायम राहणार का त्यात काही बदल होणार याची सध्या चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू होण्याचे कारण म्हणजे सलामीवीर शुभमन गिल हा तंदुरुस्त झाला आहे. डेंग्यूमुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. गिल तंदुरुस्त असेल आणि त्याचा संघात समावेश केला गेला तर एका क्रिकेटपटूला बाकावर बसावं लागेल. एकतर ईशान किशनला बाकावर बसावे लागेल किंवा श्रेयस अय्यरला बाकावर बसावे लागले.
View this post on Instagram
शुभमन गिल आजारातून बरा झाला असून त्याने नेटमध्ये कसून सराव केला आहे. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल तंदुरुस्त होणं ही हिंदुस्थानी संघासाठी आनंदाची बातमी आहे. आयपीएलमध्ये गुजरात जायंट्सकडून खेळताना गिल याने याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस पाडला होता. याशिवाय गिल सध्या जबरदस्त फॉर्मात आहे.
ईशान किशन आणि श्रेयस अय्यर बाबत बोलायचे झाल्यास या दोघांचीही कामगिरी सुमार म्हणावी अशी राहिली आहे. या दोघांनाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता. ईशान किशन हा यष्टीरक्षक आणि फलंदाज अशा भूमिकेत आहे, मात्र संघात यष्टीरक्षणाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. राहुलही सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याने किशनला तिथेही संधी नाहीये. अफगाणिस्थान विरुद्धच्या सामन्यात किशनने 47 धावा तर अय्यरने 25 धावा केल्या होत्या.
एकूण परिस्थितीचा विचार करता राहुलचे संघातील स्थान नक्की आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा यांनीही आपले स्थान बळकट केलेले असल्याने त्यांच्या जागी किशन किंवा अय्यरला संधी मिळणे मुश्कील आहे. यामुळे गिलचा संघात समावेश झाला या दोघांपैकी एकाला संघाबाहेर बसावे लागेल. प्रश्न इतकाच आहे की कोणाला बसावे लागणार.
IND vs PAK – हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही संघाकडून क्रिकेट खेळलेत ‘हे’ तीन खेळाडू



























































