
विठ्ठल देवकाते
अलीकडच्या काळात क्रीडानगरी म्हणून उदयास आलेल्या पुण्यात तब्बल 27 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. याआधी फेब्रुवारी 1996 मध्ये वेस्ट इंडीज-केनियादरम्यान पुण्यात नेहरू स्टेडियमवर वर्ल्ड कपचा सामना झाला होता. त्या लढतीत अनपेक्षितपणे केनियाने बाजी मारली होती. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए) देखणे स्टेडियम क्रिकेटच्या या महापुंभासाठी सजले आहे. विजयाच्या हॅट्ट्रिकसह सुस्साट सुटलेल्या टीम इंडियाच्या हीरोंना ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी क्रिकेटवेडय़ांची मैदानावर हाऊसफुल्ल गर्दी होणार आहे. बांगलादेशला हरवून यजमान संघ विजयाचा चौकार ठोकण्यासाठी आतुर आहे. दुसरीकडे हिंदुस्थानचा विजयरथ रोखण्यासाठी बांगलादेशी खेळाडूही मैदानावर जिवाचे रान करताना दिसतील.
टीम इंडिया फॉर्मात
हिंदुस्थानने पाच वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून आपल्या वर्ल्ड कप स्पर्धेचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर अफगाणिस्तान व कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचीही दाणादाण उडवून हिंदुस्थानने विजयाची हॅटट्रिक साजरी केलेली आहे. रोहित शर्मा व विराट कोहली हे आजी-माजी कर्णधार फॉर्मात आहेत. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर असा खोलवर फलंदाजीक्रम हिंदुस्थानची ताकद आहे. पंडय़ा, जाडेजा व ठाकूर हे अष्टपैलू खेळाडू संघासाठी प्लस पॉइंट आहेत. त्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजीचा खरा कस लागणार आहे. गोलंदाजीतही जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज ही तुफानी जोडगोळीही भन्नाट लयीत आहे. हार्दिक पंडय़ा त्यांना तोलामोलाची साथ देतोय. कुलदीप यादव, जाडेजा ही फिरकीच्या जोडगोळीमुळे हिंदुस्थानची गोलंदाजी वैविध्यतेने नटलेली दिसते.
डार्क हॉर्स बांगलादेश
या घडीला कागदावर हिंदुस्थानी संघ बांगलादेशपेक्षा कितीतरी सरस आहे, मात्र बांगलादेशचा संघही डार्क हॉर्स आहे. त्यांचा दिवस असल्यास कुठल्याही संघाला पराभूत करण्याची या संघात क्षमता आहे. मागील काही वर्षांपासून वन डे क्रिकेटमध्ये हा संघ हिंदुस्थानला नेहमी नडताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील गटफेरीच्या लढतीत याच बांगलादेशने हिंदुस्थानला हरविले होते. शिवाय गतवर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत हिंदुस्थानचा 2-1 फरकाने पराभव केला होता. याचबरोबर 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये याच बांगलादेशने हिंदुस्थानला साखळी फेरीत घरी पाठविले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आधी बांगलादेशने जगज्जेत्या इंग्लंडवर, तर नवख्या नेदरलॅण्ड्सने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेचा गेम करीत धक्कादायक निकाल नोंदविले आहेत. त्यामुळे उद्याच्या लढतीत हिंदुस्थानी खेळाडू बांगलादेशला हलक्यात घेणार नाहीत एवढे नक्की.
प्रशस्त पार्किंग
गहुंजे येथील स्टेडियमला जाणे-येणे प्रेक्षकांना सोयीचे जावे तसेच पार्किंगची कुठलीही समस्या उद्भवू नये म्हणून एमसीएने कंबर कसली आहे. स्टेडियमच्या दीड किलोमीटर परिघात एकूण 42 एकर जागा भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहे. त्या ठिकाणी एकूण 7,500 चारचाकी आणि 15,000 दुचाकी वाहनांची पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रामुख्याने पुणे, पिंपरी-चिंचवड व मुंबईकडून येणाऱया प्रेक्षकांचा विचार करून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिंदुस्थानी संघ कायम राहणार!
सूर्यकुमार यादव व मोहम्मद शमी या प्रतिभावान खेळाडूंना बाकावरच बसावे लागेल, असे टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी लढतीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विजयाची लय कायम ठेवण्यासाठी संघात बदल केला जाणार नाही. शमी व रविचंद्रन अश्विन यांना बाहेर बसविण्याचा निर्णय कठीण होता. मात्र संघ व्यवस्थापनाकडून सर्वच खेळाडूंशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले जाते, असेही म्हांब्रे यांनी सांगितले.
खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल
पुण्यातील एमसीएच्या मैदानाची खेळपट्टी ही फलंदाजीसाठी अनुकूल आहे. या मैदानावर आतापर्यंत सात वन डे लढती झालेल्या आहेत. यात आठ वेळा संघांनी 300 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे. याच मैदानावर हिंदुस्थानने इंग्लंडचे 351 धावांचे लक्ष्य पार केले होते. त्यामुळे विजयरथावर स्वार असलेल्या हिंदुस्थानला उद्याच्या लढतीत विजयासाठी पसंती मिळत आहे.
‘क्रिकेट वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर एमसीए स्टेडियम सज्ज झाले आहे. प्रशस्त पार्पिंग व अद्ययावत ड्रेनेज व्यवस्था ही या मैदानाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. शिवाय येथे क्रिकेटप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. एक हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमी या नात्याने हिंदुस्थानने या मैदानावर विजयाचा चौकार ठोकावा असेच मला वाटते. मात्र बांगलादेशचा संघ हा धोकादायक आहे. त्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंनी गाफील राहू नये एवढेच वाटते.’- शुभेंद्र भांडारकर,(सचिव, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन)




























































