
मध्य प्रदेशला पहिल्यांदा रणजीचा करंडक जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज ईश्वर पांडेने मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. मात्र, तो रोड सेफ्टीसारख्या आंतरराष्ट्रीय लीगमध्ये खेळत राहणार आहे.
मध्य प्रदेशने जूनमध्ये कारकीर्दीत प्रथमच रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. या संघात ईश्वर पांडेचा समावेश होता. 33 वर्षीय या गोलंदाजाने सोशल मीडियावर पोस्ट टाकून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. टीम इंडियामध्ये निवड होऊनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी न मिळाल्याची सल ईश्वर पांडेला सदैव बोचत राहील. 2014 च्या न्यूझीलंड दौऱयासाठी त्याची हिंदुस्थानी संघात निवड झाली होती. मात्र, तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला पदार्पणाची संधी दिली नाही.




























































