कांदळवन तोडप्रकरणी ठेकेदारासह पतन विभागाच्या सहाय्यक अभियंत्याविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिठबांव खाडीकिनारी मासे सुकविण्याचा ओटयाचे बांधकाम करताना कांदळवन तोडल्याप्रकरणी ठेकेदार तेजस चव्हाण याच्यासह पतन विभागाचे सहाय्यक अभियंता अजित लांडगे यांच्याविरुध्द देवगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तक्रार प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 7 डिसेंबर 2021 ते दि. 5 एप्रिल 2022 या कालावधीत मिठबांव अंगणवाडी कोंडवाडी खाडीकिनारी क्षेत्रात ठेकेदार तेजस सहदेव चव्हाण (30) रा.वळीवंडे यांनी पर्यावरण संरक्षण कायदा 1986 मधील तरतुदीचा भंग करून तसेच सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून मासे सुकविण्यासाठी ओट्याचे बांधकाम करतेवेळी कांदळवन प्रजातीची रायझोरीया 2, ऑव्हेसिनीया 2, हुरा 1, अशी एकूण 5 व इतर प्रजातीची बोर 1, करंज 1, पंगेरा 1 व बंधाऱ्याच्या पलीकडील बाजूस भेडस 13 व काजू 1 अशी एकूण 17 झाडांची विनापरवाना तोड केली तसेच सहाय्यक पतन अभियंता अजित लांडगे यांनी जिल्हा नियोजन समिती यांच्याकडील आदेशातील अट क्रमांक 28चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचेविरुद्ध व ठेकेदार तेजस चव्हाण या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पीएसआय दशरथ चव्हाण करीत आहेत.