
गुहागरात एक विचित्र घटना समोर आली आहे. एकाच दिवशी अंजनवेल येथून 2 महिला, 3 मुली आणि 4 बालके बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी सारे कौशल्य पणाला लावून 12 तासांच्या आता या प्रकरणाचा छडा लावला.
गुहागरातील अंजनवेल येथील आरमार मोहल्ला येथे राहणार्या 3 मुली बेपत्ता झाल्या. या मुली 11, 13 आणि 17 वर्षे वयाच्या आहेत. 5 ऑगस्ट रोजी दोन महिलांसोबत डॉक्टरकडे जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या, मात्र बराच वेळ झाला तरी मुली घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी शेजारी आणि इतर ठिकाणी विचारपूस केली तसेच या मुली ज्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या, त्यांच्याकडेही चौकशी, मात्र मुलींचा काहीच ठावठिकाणा लागला नाही.
यावेळी असे समजले की, दोन महिलांसोबत डॉक्टरांकडे जाण्यासाठी गेलेल्या या मुली प्रत्यक्षात डॉक्टरांकडे गेल्याच नाहीत. ज्या महिलांसोबत मुली गेल्या होत्या त्यांनाही घरच्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुलींच्या आईने रात्री 12 वाजेपर्यंत शोधाशोध सुरूच ठेवली होती. त्यानंतर त्यांनी मध्यरात्री पोलीस स्थानकात संपर्क साधला आणि घडल्या प्रकाराविषयी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांनी या घटनेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वेगळीच माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. ज्या दोन महिलांनी 3 मुलींना नेले होते. त्यांनी त्यांच्याही 9 वर्षे, 6 वर्षे आणि 1 वर्ष आणि 1 महिन्याच्या बाळालाही सोबत नेले होते. म्हणजे या दोन महिलांसोबत 3 अल्पवयीन मुली आणि 4 बालके होती. पोलीस स्थानकात खबर मिळताच पोलीस अधीक्षकांना ही माहिती देण्यात आली. अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. गुहागर पोलीस अधिकारी सचिन बारी यांना सूचना केल्या. 4 स्वतंत्र पथके मोहिमेवर पाठवली. यामध्ये दोन अधिकारी, चार अंमलदार यांची 4 पथके तयार करण्यात आली. ही पथके दापोली, दाभोळ, चिपळूण, मुंबई अशा दिशेने पाठवण्यात आली.
मुंबईच्या दिशेने तपासासाठी गेलेल्या पथकाला या दोन महिला मुंबईच्या दिशेनेच गेल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहिल्यानंतर मुंबई दादर परिसरात या दोन महिला असल्याचे समजले. तातडीने पोलिसांनी शोधाशोध घेत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या 3 अल्पवयीन मुली आणि 4 बालकांनाही ताब्यात घेऊन मुलांना धीर दिला. त्यानंतर त्या 3 अल्पवयीन मुली आणि बालकांना गुहागर येथे आणून पालकांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.






























































