
गेल्या काही महिन्यांपासून पत्नीने पतीचा खून केला किंवा पतीने पत्नीचा खून केला, अशा अनेक घटना देशाच्या कानाकोपऱ्यात घडत आहेत. त्यामुळे समाज हादरून गेला आहे. आता पुन्हा एकदा पत्नीने झोपेत असलेल्या पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे मुलांच्या शेजारीच या निर्दयी महिलेने नवऱ्याचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून संपूर्ण जिल्हा या घटनेमुळे हादरून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाला दास हा कामावरून रात्री 10 च्या दरम्यान कामावरून घरी आला होता. घरी आल्यानंतर पत्नी उषाकडे जेवणाची मागणी केली असता त्यांच्यामध्ये वाद झाला. वाद झाल्यानंतर बाला दास मुलांच्या शेजारी अंगणात जाऊन झोपला. याच दरम्यान उषाने डाव साधला आणि त्याचा धारधार शस्त्राने गळा चिरला. रक्ताच्या चिळकांड्या उडल्याने मुलांना जाग आली. तिने मुलांनाही धमकी दिली. मात्र घाबरलेली मुलं आरडाओरडा करत घराबाहेर पळून गेली. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. धमदाहा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालायत दाखल केला. तसेच खूनी उषाला बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.