नौदल कर्मचाऱ्याकडून प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले; श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती, शीर आणि हात जाळण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती आंध्र प्रदेशात घडली आहे. विशाखपट्टणम येथे एका विवाहित नौदल कर्मचाऱ्याने त्याच्या प्रेयसीची अतिशय निर्दयीपणे हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. एवढेच नव्हे तर, त्याने प्रेयसीचे शीर आणि इतर काही अवयव जाळण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे आंध्र प्रदेश हादरला आहे.

मोनिका असे 31 वर्षीय मृत महिलेचे नाव असून चिंतादा रवींद्र (35) असे आरोपीचे नाव आहे. रवींद्र हा नौदलात तांत्रिक कर्मचारी आहे. रवींद्रने मोनिकाऐवजी दुसऱया मुलीसोबत लग्न केल्यामुळे दोघांमध्ये सतत भांडणे व्हायची. त्याची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. ही संधी साधून त्याने तिला स्वतःच्या घरी बोलावले. तिथे त्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. तिचे शीर आणि हात एका निर्जन स्थळी जाळण्याचा प्रयत्न केला. धड फ्रीजमध्ये ठेवले आणि पाय व इतर अवयव ट्रॉलीबॅगमध्ये लपवले. घटनेनंतर त्याने स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यानंतर या काळीज हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. पोलिसांनी रवींद्रला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. मोनिकाचे शीर आणि मृतदेहाचे इतर अवयव शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले असून युद्धपातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे.

डेटिंगअॅपवरील ओळखीतून फुलले प्रेम

रवींद्रची मोनिकासोबत वर्ष 2021मध्येमिंगलया डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. ही ओळख प्रेमात रूपांतरित झाली. रवींद्रने 2024मध्ये दुसऱया मुलीसोबत विवाह केला. यावरून दोघांमध्ये खटके उडायचे. मोनिकाने त्याला त्याच्या पत्नीला सर्व काही सांगण्याची धमकी देत 3.5 लाख रुपये उकळले होते. मोनिकाची हत्या केल्यानंतर त्याने एक मोठा चाकू ऑनलाइन शॉपिंग अॅपवरून मागवल्याचे तपासात उघड झाले आहे.