
सामना प्रतिनिधी । परभणी
मदिनानगर परिसरात मागील वर्षभरापासून विविध प्रकारच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून खून, मारामार्या, चोर्या, दरोडे, बलात्कार, दादागिरी वाढली असून पोलिसांचा वचक या परिसरात राहिला नाही. रात्रीची गस्तही थंडावली असून यामुळेच नुकताच एका २३ वर्षीय नवतरुणाचा क्षुल्लक कारणावरुन खून झाला. यावरुनच त्या भागातील गुन्हेगारांची दहशत किती खोलपर्यंत रुजली आहे, याची कल्पना येते. रात्री उशिरा व मध्यरात्रीनंतरही गुन्हेगार रस्त्यावर बसून जनसामान्यांना वेठीस धरतात. त्यामुळे जनसामान्यातून भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोणीही दहशतीमुळे आवाज उठवत नाही. अनेक नागरिकांनी या परिसरातील स्वत:चे घरे विकून इतर भागात स्थलांतर केले आहे. तेथे पोलीस चौकीची आवश्यकता आहे. पोलिसांनी या भागात गस्त वाढवून गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शहरातील धाररोड हा परिसर अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. धाररोडवर मदिननगर, सेवकनगर, रहेमतनगर, रामेश्वरनगर, मल्हारनगर, आनंदनगर, झोपडपट्टी तसेच कॅनॉललगत असलेल्या वस्त्यामध्ये अलीकडील काळात गुन्हेगारी वाढत चालली आहे. छोट्या-मोठ्या कारणामुळे मारामार्या होत आहेत. चाकू, सुर्या, तलवारीचा वापर या भांडणांमध्ये होऊ लागला आहे. मागील वर्षभरातील गुन्हेगारीचे नोंदणी दफ्तर पाहिले असता याच भागातून नानलपेठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. यामुळेच पोलिसांची अधिक जबाबदारी वाढली आहे.
नुकताच फरशीचे घाव घातल्याने खुन झालेल्या युवकाचे नाव शेख मोबीन शेख अखिल (२२, रा.मदिना पाटी) असे असून हा खून हा क्षुल्लक कारणामुळे झाला. सय्यद फरहान सय्यद मुसा (३३, रा. मदिना पाटी) या आरोपीला पोलिसांनी अटकही केली. परंतु यामुळे पोलिसांना जबाबदारी झटकता येणार नाही. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना या भागात विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. रात्रीच गस्त वाढवावी लागणार आहे. तसेच विविध गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळवून गुन्हेगारांवर पोलिसांची जबर वचक राहिल, अशी कारवाई पोलिसांना करावी लागणार आहे. तसेच गुन्हेगारांविरुद्ध आरोपपत्र दाखल करताना जास्तीत जास्त किंवा कठोर शिक्षा कशी होईल याचा सखोल अभ्यास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे लागणार आहेत.
परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय हे कर्तव्यदक्ष व प्रमाणिक अधिकारी आहेत. त्यांनी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीमनवार यांची तातडीने उचलबांगडी करुन पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. पाथरी मध्ये अवैध धंद्यांना उत आला होता. अनेक प्रकारचे अवैधधंदे पाथरी पोलीस ठाण्यांतर्गत चालत असल्याने गुन्हेगारांना एक प्रकारे अभय मिळत होते. त्यामुळे श्रीमनवार यांना बलवावे लागले. परंतु परभणी शहर व जिल्ह्यात अवैध धंद्याचे प्रमाण कमी अधिक सर्वत्र आहे. अवैध धंदेही परभणी जिल्ह्याची एक प्रकारे गरज होऊ पाहत आहे. अवैध धंदे मुळापासून उखडणे हे कुणालाच शक्य दिसून येत नाही. कारण परभणी जिल्ह्यात वर्षानूवर्षापासून अवैध धंद्यांना खतपाणी घालण्यात आल्यामुळे या अवैध धंद्याच्या वृक्षाची पाळेमुळे खोलपर्यंत रुजली आहेत. तरीही पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचे प्रयत्न सातत्याने सुरु असून ते कुणाचीही गय करत नाहीत. गुन्हेगारी संमुळ नष्ट करण्याचा त्यांचा परभणीत आल्यापासूनच प्रयत्न सुरु आहे. परभणीत पोलीस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी गुन्हेगारीविरुद्ध कठोर पावले उचलणार असल्याचे जाहीर केले होते.




























































