
भीमा नदी पात्रातील अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने पोलिसांच्या दुचाकीला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकासह तिघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 24 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.05 वाजेच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणात एका बोलेरो जीपचे नुकसान झाले आहे. सुधीर सोरटे यास ताब्यात घेतले असून महादेव लक्ष्मण शेळके, समाधान जरक सर्व रा. टाकळी ता. माढा अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. मंगळवार भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर याना मिळाली. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख व घाडगे हे कारवाई करण्या करिता घटनास्थळी दाखल झाले. रात्री 12 वाजण्याचा सुमारास ट्रॕक्टर क्रमांक एम. एच. 43 क्यू 3394 चालकाला थांबवून ट्रॅक्टर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी घ्यायला सांगितले असता ट्रॅक्टरमध्ये बसलेले सुधीर सोरटे यांनी हातात टॉमी घेऊन पोलीसांचा अंगावर धावून आला. तसेच धक्काबुक्की करून मालक समाधान जरक याने ट्रॅक्टर चालकास पोलिस आडवे आले तर ट्रॅक्टर अंगावर घालण्यास सांगितले. पोलीसांची दुचाकी क्रमांक एम. एच. 45 एम. 7270 या गाडीचे नुकसान केले. तसेच गावातील बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम. एच. 21 व्ही. 9363 गाडीचे नुकसान करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख यांना किरकोळ मार लागला आहे. पोलीसांचा अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वरील तीघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैधरित्या धंदे करणाऱयांना मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा नुतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.

























































