
सहा महिन्यांमध्ये फ्लॅट देतो सांगून बिल्डरने ग्राहकाला 21 लाख रुपयांचा चुना लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सात वर्षांमध्ये एक वीटही रचली नाही. ‘वैष्णव कन्स्ट्रक्शन’ असे या ठकबाज कंपनीचे नाव असून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केली आहे. बिल्डरवर एवढी मेहेरबानी करण्याचे कारण काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारला जात आहे. या बिल्डरने आणखी किती जणांची फसवणूक केली याची चौकशी करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कांदिवलीमधील संजय चव्हाण, विवेक सिंग व अंगद जाधव या तिघांनी एकत्र येऊन ‘वैष्णव कन्स्ट्रक्शन’ कंपनी स्थापन केली. गावठाण क्षेत्रातील चाळीचे रिडेव्हलपमेंट त्यांच्यामार्फत करण्यात येणार होते. तेथे बांधण्यात येणाऱया ‘गंगा टेरेस’ इमारतीमध्ये चारशे स्क्वेअर फुटांचा फ्लॅट सुधीर म्हात्रे यांनी 2013 मध्ये बुक केला. त्याची किंमत होती 38 लाख रुपये. बिल्डरने सर्व प्रकारची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचे सांगितल्याने त्यांनी विश्वास ठेवून 38 पैकी 25 लाख रुपये आठ टप्प्यांमध्ये दिले. त्यानंतर संजय चव्हाण आणि त्यांच्या पार्टनर्सनी ‘वैष्णव कन्स्ट्रक्शन’चे नाव बदलून वैष्णव डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स (प्रा.) लिमिटेड असे केले. या कंपनीत हेच तिघे भागीदार आहेत. कंपनीचे नाव बदलून आम्ही सुधीर म्हात्रे आणि अन्य खरेदीदारांकडून पैसेच घेतले नाहीत, असा कांगावा करून फसवणुकीचा प्रकार केला आहे.
बिल्डरबरोबर करार करूनही प्रत्यक्षात इमारत उभी रहिलीच नाही. सुधीर म्हात्रे यांच्याबरोबरच कांदिवलीमधील अनेक मध्यमवर्गीयांनी फ्लॅट बुक केले आहेत. या सर्वांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी अनेकदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली. अगदी सहपोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत सर्वत्र ‘वैष्णव कन्स्ट्रक्शन’च्या कारनाम्यांची माहिती दिली. पण बिल्डरवर कोणतीही कारवाई झाली नाही.
स्थानिक आमदार योगेश सागर यांनी कांदिवली पोलीस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांना पत्र पाठवून बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण हे पत्रही केराच्या टोपलीत टाकले.
पंधरा लाखांचे चेक बाऊन्स
फ्लॅट देणार नसाल तर माझे 25 लाख परत करा, अशी वारंवार विनंती सुधीर म्हात्रे यांनी संजय चव्हाण, विवेक सिंग व अंगद जाधव या बिल्डरांकडे केली. अनेक हेलपाटे घातल्यानंतर फक्त चार लाख रोख दिले. त्यानंतर सहा लाखांचा, पाच लाखांचा, तीन लाखांचा व नंतर एक लाखाचा असे चार चेक दिले. पण ते बाऊन्स झाले. अजूनही उरलेले 21 लाख रुपये या बिल्डरांकडे अडकले असून मनमानी व मध्यमवर्गीयांना फसवणाऱया ‘वैष्णव कन्स्ट्रक्शन’वर कठोर कारवाई करावी व आपले सगळे पैसे परत मिळावेत, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.
सेनेने केली आहे. याबाबत पालिका आयुक्तांना पत्र दिल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले. क्षयरोग निर्मूलन कंत्राटी कर्मचाऱयांना आहारभत्ता, 36 दिवसांची भरपगारी रजा, रिक्त पदांचे समायोजन आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.





























































