श्रीरामपूरात सराईत गुन्हेगाराला गावठी कट्ट्यासह अटक; पुण्यातून चोरलेली अॅक्टिवा जप्त

श्रीरामपूर शहर पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पकडले असून त्याच्याकडून गावठी कट्ट्यासह, जिवंत काडतूस व पुणे येथून चोरलेली अॅक्टिवा असा 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बळीराम उर्फ बल्ली रामचीत यादव (वय 30, रा. सरस्वती कॉलनी, देवकर वस्ती, वार्ड नं. 7, श्रीरामपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

श्रीरामपूर शहराच्या कचरा डेपोशेजारील खबड्डी येथे एका व्यक्तीकडे गावठी कट्टा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पाटील, हेड कॉन्स्टेबल जोसेफ साळवे, कॉन्स्टेबल किशोर जाधव, राहुल नरवाडे, पंकज गोसावी, राहुल गायकवाड यांनी सापळा रचून बळीराम उर्फ बल्ली रामचीत यादव याला पकडले.

त्याची झडती घेतली असता गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस, अॅक्टिवा गाडी असा एकूण 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, अॅक्टिवा पुणे येथून चोरून आणल्याची कबुली आरोपीनी दिली. आरोपीवर गंठण चोरी, मोबाईल चोरी असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहर पोलीसांनी बळीराम उर्फ बल्ली रामचीत यादव यांच्या विरुद्ध आर्म एक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या