पिकविम्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील प्रलंबित पीक विमा कंपन्यांकडील पीक विम्याची प्रकरणे तत्काळ निकाली काढा. सन 2016 ते 2019 या कार्यकाळात किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तसेच किती शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली याची माहिती तत्काळ सादर करा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील विमा कंपन्यांना प्रकरणे निकाली काढण्याचे निर्देश दिले. डॉ. गोऱहे म्हणाल्या, महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. पंतप्रधान पीक विमा योजना 1985 साली स्थापन झाली. दरवर्षी शेतकरी न चुकता पीक विमा भरतात. सन 2016 ते 2019पर्यंत शेतकऱयांनी पीक विमा काढला आहे. मागील वर्षी कोरडय़ा आणि आता ओल्या दुष्काळाने शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत पीक विमा कंपन्या शेतकऱयांचे हक्काचे विम्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करतात. यामुळेच पीक विमा कंपन्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. यासाठीच पीक विमा कंपन्यांना शेतकऱयांची प्रलंबित विम्याची प्रकरणे किती आणि सध्याची स्थिती काय याची माहिती लेखी स्वरूपात आठ दिवसांत सादर करण्यास सांगितल्याचे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.