
सामना प्रतिनिधी । लातूर
मराठवाड्यावर दुष्काळसदृष्य परस्तिथीचा सामना करत असताना अजून एक अस्मानी संकट आले आहे. मका आणि ज्वारीच्या पिकांवर अमेरीकन लष्कर अळीचा हल्ला झालेला आहे. लष्करी अळी नवीन नाही मात्र ही अळी अमेरीकन लष्करी आहे. ही बहुभक्षी कीड आहे यामुळे सर्वच पीकांवर हा प्रादुर्भाव पहावयास मिळतोय. ही प्रजाती प्रथमत: २०१५ साली अमेरिकेत आढळली होती. या वर्षी ही अळी कर्नाटकात पहावयास मिळाली आणि मराठवाड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात या अळीचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे.
या अळीचा आहार भरपूर असल्याने ती लवकर पिकांचे शेंडे खाते. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते. निलंगा तालुक्यातील पानचिंचोली येथील शंकर मोरगे यांच्या शेतात या अळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पहावयास मिळाला. दोनवेळा फवारणी करून पण हा प्रादुर्भाव कमी न झाल्याने आज जिल्हा कृषी अधिकारी डॉ. वसंत सुर्यवंशी आणि त्यांच्या टीमने आज या शेताची पहाणी केली आणि त्यावरील उपाय योजनाची माहिती दिली. हा प्रादुर्भाव कसा थांबता येईल यावरती शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी गावातील शेतकरी आणि कृषी अधिकारी आणि त्यांचा चमू उपस्तिथ होता.
































































