सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा चुना, फसवणूक करणाऱ्या भामट्याला अटक

केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरी लावून देतो अशी बतावणी करत राज्यातील अनेक तरुणांकडून पैसे उकळत कोटय़वधी रुपयांची फसवणूक करणाऱया ठगाला मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने बेडय़ा ठोकल्या.

मूळचा बीडचा असलेला संतोष घरपुडे याला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्याच्याकडून तसेच अन्य तरुणांकडून बार्शीचा असलेला नीलेश राठोड याने पाच ते 15 लाख रुपये घेतले होते. पैसे घेतल्यानंतर त्याने बनावट वैद्यकीय तपासणी व बनावट नियुक्तीपत्र देऊन सर्वांची फसवणूक केली होती. नीलेशचा पोलिसांनी शोध सुरू केला. पण त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. आरोपीची पत्नी दिल्लीत राहत असल्याचे कळताच पोलिसांचे पथक दिल्लीत धडकले. कसून तपास केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीविरोधात आझाद मैदान, डेक्कन पोलीस ठाणे, वाशी, अकोला याशिवाय अन्य राज्यांतील पोलीस ठाण्यांत फसवणुकीचे गुन्हे दाखल असून फसवणुकीचे 60 हून अधिक तक्रारी दाखल असल्याचे समोर आले आहे.

सीआयएसएफमधील बडतर्फ अंमलदार

आरोपी नीलेश राठोड हा सीआयएसएफचा बडतर्फ अंमलदार आहे. 2022 नंतर त्याने अनेक तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवले. आतापर्यंत त्याने दोन कोटी 88 लाख रुपये इतकी फसवणूक केल्याचे समोर आले असून फसवणुकीचा हा आकडा दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.