पाटोद्यातील कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच; अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ

पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापूर्वी 26 कावळे मृतावस्थेमध्ये आढळून आले होते. कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. यासाठी मृत कावळ्यांचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले होते. याचा अहवाल सोमवारी मिळाला असून पाटोद्यातील कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचे समोर आले आहे. या अहवालानंतर बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे पथक मुगगावात तळ ठोकून आहेत.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे दोन दिवसापूर्वी 26 कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. एकीकडे बर्ड फ्ल्यूची लागण झपाट्याने वाढत असताना पाटोदा तालुक्यातील या कावळ्यांचा मृत्यू नेमका कशाने झाला याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सुरूवातीला ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, मृत्युमुखी पडलेल्या कावळ्यांची संख्या वाढत गेल्याने पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांचे एक पथक मुगगावामध्ये दाखल झाले. या पथकाने गावाची पाहणी केली.

मृत झालेल्या कावळ्यांचे अवशेष ताब्यात घेतले आणि हे नमुने तपासणीसाठी भोपाळच्या आयसीएआर या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी दुपारी मिळाला. कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यूनेच झाला असल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या गंभीर घटनेनंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांचा संपर्क नंबर बंद होता. अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभागाचे एक पथक मुगगावमध्ये दाखल झाले आहे. खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणी कावळे किंवा कोंबडे मृतावस्थेत आढळून आल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मृत कावळ्यांमध्ये सापडला एच 5 एन 8 विषाणू
बीड जिल्ह्यामध्ये मृत कावळ्यांमध्ये जो विषाणू सापडला आहे तो एच 5 एन 8 या प्रकारातील आहे. तर राज्याच्या इतर भागात सापडलेला विषाणू एच 1 एन 8 या प्रकारातील आहे. राज्यात इतर ठिकाणी सापडलेल्या विषाणुच्या तुलनेत बीडमध्ये सापडलेला विषाणूची संसर्ग क्षमता कमी असल्याचे तज्ञांचे मत आहे. संसर्गित पक्षाच्या निकट संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच याची बाधा होऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या