
अखंड हिंदुस्थानातील पहिले स्थापन झालेल्या श्रद्धानंद समाजाच्या आजोबा गणपतीसह सुमारे वीस ते पंचवीस मंडळांच्या बहारदार लेझीम, झांज, ढोल पथक, शक्तिप्रयोग, मर्दानी खेळ, गुलालाची व फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि भगवा झेंडा फडकवित ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या…’ या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर मोठ्या उत्साहात आनंदाने श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडल्या.
स्वातंत्र्यपूर्व स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मिरवणुकीत पंचवीस ते तीस मंडळांनी सहभाग घेतला होता. या मिरवणुकीचा प्रारंभ मानाच्या देशमुखांच्या गणरायाच्या मूर्तीची देशमुख वाड्यात विधिवत पूजन आणि आरतीने करण्यात आली. यावेळी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, किरण देशमुख आदी उपस्थित होते.
टाळ-मृदंगांचा गजर आणि ढोल-ताशा आवाजाने गणेशभक्त भारावून गेले होते. विविध फुलांची सजावट केलेल्या पालखीतून मिरवणूक दुपारी दोन वाजता देशमुख वाड्यातून निघाली. मिरवणूक दुपारी तीन वाजता बालाजी मंदिर येथे आल्यानंतर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, आमदार विजयकुमार देशमुख, राजशेखर हिरेहब्बू, दिलीप कोल्हे आदी मान्यवरांच्या हस्ते पालखीतील ‘श्रीं’च्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली.
पुढील मार्गावर बाळीवेस, टेलिफोन भवन, मंगळवार पेठ पोलीस चौकी, सराफ बाजार, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक मार्गे गणपती घाट येथे मानाचा देशमुखांचा गणपती, तर आजोबा गणपती मूर्तीचे विसर्जन लक्ष्मी मार्केटसमोर असलेल्या श्री विष्णू मंदिर जवळ विष्णू घाटावर सकाळी सात वाजता ट्रस्टी अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते विधिवत धार्मिक कार्याने करण्यात आले. याप्रसंगी सर्व ट्रस्टी, उत्सव पदाधिकारी व श्री गणेश उपस्थित होते.
रविवारी सकाळी सात वाजता आजोबा गणपतीच्या ‘श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन विष्णू घाट येथे करण्यात आले. शहरातील थोरला मंगळवेढा तालीम सोन्या मारुती तरुण मंडळ, शेठजी गणपती राजस्थानी मंडळ, कुबेर गणपती गोल चावडी, ओम गणेशोत्सव मंडळ, बाळीवेस गणेशोत्सव मंडळ, पाणीवेस मंडळ, समर्थ तरुण मंडळ, लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळासह आदी मंडळांच्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर लेझीमचा बहारदार खेळ सादर करत गुलालाची उधळण केली.
शहरातील पाचही गणेश मध्यवर्ती मंडळांच्या मिरवणुका शांततेत पार पडल्या. डॉल्बीच्या विरोधात जनआंदोलन झाल्यामुळे त्याचा परिणाम यंदाच्या गणेशोत्सव काळात दिसून आला. अनेक मंडळांनी विना डॉल्बी विसर्जन मिरवणुका काढल्या. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
निषेधाचे फलक
यंदाच्या गणेशोत्सवात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याच्या हट्टापायी अनेक मंडळांवर प्रशासनाकडून टॉर्चर करण्यात आल्याने मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणुकीत निषेधाचे फलक झळकावून प्रशासनावरील आपला राग व्यक्त केला आहे.
कॉरिडॉरला विरोध
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील कॉरिडॉरबाधितांनी विसर्जन मिरवणुकीत पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा, अशी मागणी करणारे फलक दाखविले. तसेच गणेशभक्तांनी कॉरिडॉर रद्द करावे, अशा आशयाचे जॅकेट घालून लक्ष वेधून घेतले.