
सामना ऑनलाईन । कश्मीर
जम्मू कश्मीरमध्ये गणेश चतुर्थीच्यादिवशी बाप्पाला सीआरपीएफच्या काही जवानांनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ देत सॅल्यूट ठोकला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बाप्पाला सॅल्यूट ठोकणाऱ्या जवानांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या गुरुवारी कश्मीरमधील राष्ट्रीय महामार्गाजवळील सीआरपीएफच्या ७३ व्या बटालियनच्या मुख्यालयात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. वाजत गाजत मुख्यालयात आणलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला सात जवानांनी गार्ड ऑफ ऑनर देत सॅल्यूट ठोकला. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये सर्व जाती धर्माचे सण साजरे केले जातात, असे असतानाही जवानांनी बाप्पाला दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरवरून जवानांच्या चौकशीचे आदेश कमांडट पीपी पॉली यांनी दिले आहेत. ‘काही जणांच्या अतिउत्साहामुळे हा प्रकार घडला आहे. पण एखादा धार्मिक सण साजरं करणं हा सीआरपीएफच्या प्रोटोकॉलचा भाग नाही, त्यामुळे त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली नाही. असे असले तरी घडलेल्या प्रकाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत’, असे पॉली यांनी सांगितले.
दरम्यान, जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर हे वरिष्ठांना तसेच महत्त्वाच्या व्यक्तींना दिले जाते. धार्मिक कार्यक्रमात जवानांनी सलामी देणे हे नियमांचे उल्लंघन असल्याचे एका अधिकाऱ्याने म्हटले होते.



























































