बारामतीत सीआरपीएफ जवानाला पोलिसांची मारहाण, पोलिसांविरोधात संतापाची लाट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बारामती

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून देशात संतापाचे वातावरण असताना आता बारामतीत पोलिसांनी एका सीआरपीएफच्या जवानाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांविरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशोक इंगवले असे या जवानाचे नाव असून ते गणवेषात असताना पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या. 10 ते 15 पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप इंगवले यांनी केला असून सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत डांबून ठेवल्याचाही आरोप इंगवले यांनी केला आहे.

पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांसाठी सोनगाव येथे श्रद्धांजली सभेच्या आयोजनाची परवानगी मागण्यासाठी अशोक इंगवले बारामती पोलीस ठाण्यात आले होते. मात्र दुचाकीवरून ट्रिपल सीट का आले असा जाब विचारत त्यांना मारहाण केली तसेच त्यांच्यासोबत आलेले माजी सैनिक किशोर इंगवले यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे. पोलिसांच्या या मग्रुरी विरोधात परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.