IPL 2025 – आम्ही घाबरणार नाही, पुढचा मोसम आमचाच!

चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतरही घाबरणार नाही. हा हंगाम चेन्नईसाठी खडतर असला तरी काही तरुण खेळाडूंच्या कामगिरीने आशेचा किरण दाखवला आहे, असा विश्वास फलंदाजी प्रशिक्षक मायकेल हसीने व्यक्त करत, पुढचा मोसम आमचाच असेल असाही विश्वास बोलून दाखवला.

पाच वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्ज दहा संघांच्या लीगमध्ये दहा सामन्यांतून फक्त चार गुणांसह शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे चेन्नई प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला आहे. या वर्षी संघाकडून चांगली कामगिरी झाली नाही. असे असले तरी आम्ही निश्चितच घाबरणार नाही. काही बाबींमध्ये सुधारणा करावी लागेल. आम्हाला माहिती आहे की, आम्ही पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहोत, पण मी फार पुढचा विचार करत नाहीये. आमच्याकडे सामना जिंकणारे खेळाडू आहेत. आम्ही कोणत्याही संघाशी स्पर्धा करू शकतो. काही खेळाडूंसाठी आयपीएलमध्ये खेळण्याची संधी खूप चांगली होती. आशा आहे की, तो पुढील काही वर्षांत संधींचा फायदा घेईल आणि संघात आपले स्थान पक्के करेल, असे हसी म्हणाला.