
केंद्रीय शिक्षक पात्रता (सीटीईटी) परीक्षेदरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला. परीक्षार्थी महिला उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश देताना त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र सक्तीने काढायला लावले. इतकेच नव्हे तर पायातील जोडवीही काढून घेण्यात आली. या प्रकारानंतर महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी ‘परीक्षा हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात’, असा संताप व्यक्त केला.
परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून अद्ययावत गॅझेट्सचा वापर केला जातो असे प्रकार पूर्वी उघडकीस आले होते. त्या दृष्टिकोनातून राज्यात सीटीईटी परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींना धातूचे साहित्य परीक्षा केंद्रात नेता येणार नाही अशा सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याआधारे महिला परीक्षार्थींच्या गळ्यातील मंगळसूत्रेही उतरवली गेली. पायातील चांदीची जोडवीही काढून ठेवण्यास सांगण्यात आले.
मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांचे सौभाग्यलेणं असते. त्यामुळे मंगळसूत्रे काढून ठेवण्यास सुरक्षारक्षकांनी सांगताच महिला परीक्षार्थी संतप्त झाल्या. मात्र मंगळसूत्र काढल्याशिवाय आत प्रवेश देणार नाही अशी धमकीच सुरक्षारक्षकांनी दिली. हा कोणता नियम आहे? असा लेखी नियम आहे का? अशी मागणी महिला उमेदवारांबरोबर आलेल्या नातेवाईकांनी केली. त्यावर पर्यवेक्षकांचे आदेश आहेत असे सुरक्षारक्षकांनी सांगितले. त्यामुळे करीअरच्या चिंतेने नाइलाजास्तव रडत-रडत आणि तितक्याच संतापात महिलांनी आपल्या अंगावरचे मंगळसूत्र व अन्य दागिने सुरक्षारक्षकांच्या हवाली केले.
चौकशी करू
परीक्षेत गैरप्रकार करण्यासाठी परीक्षार्थींकडून वेगवेगळी उपकरणे अंगावर लपवून नेली जात असल्याचे यंत्रणांनी मागच्या वेळेस सांगितले होते. तरीसुद्धा मंगळसूत्र काढून घेणे योग्य नाही. त्याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
हेच का हिंदुत्व? – दानवे
‘स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱयांच्या राज्यात महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावे लागते, हे दुर्दैवी आहे. मंगळसूत्र सौभाग्याचं प्रतीक आहे. सरकारने ही जाचक नियमावली तत्काळ बदलली पाहिजे’, असे शिवसेना नेते अंबादास दानवे म्हणाले.
























































