
ऑनलाइन क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करून देण्याच्या बहाण्याने अज्ञात सायबर भामट्याने मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना सहा लाखांना ठकवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
28 फेब्रुवारी रोजी संबंधित न्यायमूर्तीं एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरील रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्याचा प्रयत्न करत होते यासाठी एका हेल्पलाइनवर त्यांनी कॉल केला. फोन उचलणाऱया व्यक्तीने व्हॉट्सऍपवर लिंक पाठवत ऑप्लिकेशन फाइल डाऊनलोड करण्यास सांगितले व रिवॉर्ड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्रेडिट कार्डची माहिती भरण्यास सांगितले. संबंधित ऑप्लिकेशनवर माहिती भरल्यानंतर क्रेडिट कार्डवरून अनेक व्यवहार करून न्यायमूर्तींची 6 लाख 2 हजार 566 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी न्यायमूर्तींनी तत्काळ तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय न्याय संहिताअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.






























































