अभिनेत्रींच्या बँक खात्यावर मारला डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओएलएक्सवर जुना पियानो विकणे अभिनेत्रीला चांगलेच महागात पडले आहे. सायबर ठगाने पियानो खरेदीच्या नावाखाली अभिनेत्रीची अडीच लाख रुपयांची फसवणूक केली आहे. फसवणूकप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

तक्रारदार अभिनेत्री वर्सोवा येथे राहतात. त्यांनी ओएलएक्स ऍप्सवर घरातील जुना पियानो विक्रीची जाहिरात दिली होती. ती जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांनी संपर्क साधला. ठगाने तो पियानो साडेचौदा हजार रुपयांना विकत घेण्याची तयारी दाखवली. पैसे ऑनलाइन वॉलेटवरून पाठवू, असे ठगाने अभिनेत्रीला सांगितले.

अभिनेत्रीला एक ई वॉलेट ऍप्स डाऊनलोड करण्यास सांगून आमीष दाखविले. त्यानंतर क्यूआरकोड मिळाला नसल्याचे सांगून ठगाने अभिनेत्रीला पुन्हा क्यूआरकोड पाठवण्यास सांगितले. ठगाने अभिनेत्रीला बोलण्यात गुंतवून ई वॉलेटच्या माध्यमातून विविध खात्यांत अडीच लाख रुपये पाठवले.

पैसे गेल्याचे लक्षात आल्यावर अभिनेत्रीने ठगाला जाब विचारला. त्याने पैसे पुन्हा पाठवतो असे सांगून पैसे परत केले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अभिनेत्रीने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.