
परदेशात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना सायबर गुलामगिरीच्या (Cyber Slavery) जाळ्यात ढकलणाऱ्या एका मोठ्या टोळीचा गुजरात पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन एजंटना अटक केली असून, त्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना कंबोडिया आणि म्यानमार सारख्या देशांत पाठवून तिथे त्यांच्याकडून जबरदस्तीने सायबर गुन्हे करून घेतले जात असल्याचे समोर आले आहे.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, हे एजंट सोशल मीडिया आणि जाहिरातींच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधत असत. डेटा एन्ट्री किंवा आयटी क्षेत्रातील चांगल्या नोकरीचे स्वप्न दाखवून त्यांना परदेशात बोलावले जाई. मात्र एकदा का हे तरुण तिथे पोहोचले की, त्यांचे पासपोर्ट जप्त केले जात आणि त्यांना एका बंदिस्त इमारतीत ठेवले जाते. तिथे त्यांना दिवसातून १५-१८ तास काम करण्यास भाग पाडले जात असे. जर कुणी नकार दिला, तर त्यांना मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असे.
या तरुणांचा वापर प्रामुख्याने जगभरातील लोकांची सायबर फसवणूक करण्यासाठी केला जात होता. बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून गुंतवणूक, टास्क स्कॅम आणि डेटिंग ॲप्सद्वारे लोकांची फसवणूक करण्याचे काम या सायबर गुलामांना करावे लागत होते. गुजरात पोलिसांनी या रॅकेटचा छडा लावत अटक केलेल्या संशयितांकडून अनेक महत्त्वाचे दस्तऐवज आणि मोबाईल जप्त केले आहेत.
या कारवाईनंतर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परदेशात नोकरीसाठी जाताना अधिकृत एजन्सीमार्फतच प्रक्रिया पूर्ण करावी. सोशल मीडियावरील संशयास्पद जाहिरातींना बळी पडू नका, अन्यथा मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरले असून, पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत आहेत.



























































