
लॉक करून ठेवलेल्या महागडय़ा सायकल चोरून त्या मिळेल त्या किमतीत विकणारा सराईत सायकल चोर ना. म. जोशी मार्ग पोलिसांच्या हाती लागला आहे. नशेसाठी सायकल चोरणाऱ्या लक्ष्मीनारायण वैश्य याच्याकडून पोलिसांनी 11 सायकली हस्तगत केल्या आहेत.
प्रभादेवी येथील आहुजा टॉवर नंबर 3 मध्ये राहणाऱ्या निखिल साळुंखे याची महागडी सायकल चोरीला गेली होती. निखिलच्या तक्रारीनंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नौशाद तांबोळी तसेच पिंटो, भंगाळे, पगारे, सोनवणे या पथकाने घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी अॅण्टॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तांबोळी व पथकाने शोध मोहीम राबवून सायकल चोर लक्ष्मीनारायण वैश्य याला पकडले. वैश्यने अॅण्टॉप हिल परिसरातील झोपडपट्टी परिसरात चोरीच्या 11 सायकली लपवून ठेवल्या होत्या. त्या सायकलीदेखील पोलिसांनी जप्त केल्या. त्या सायकली विकल्या न गेल्याने त्याने लपवल्या होत्या. लक्ष्मीनारायण नशेबाज असून दिवसा चोऱ्या करतो आणि रात्रीचा केईएम रुग्णालयात झोपतो, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

























































