सामना प्रतिनिधी । परळी वैजनाथ
शहरातील गाव भागात असणाऱ्या चुकार गल्लीतील एका इसमाने रात्री 9 च्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा लावून घेतला. याबाबतची माहिती देण्यासाठी नातेवाईक आणि गल्लीतील नागरिक शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तेथे गेल्यावर त्या इसमाने यांना दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी विनवणी केली. हे सर्व सुरू असतानाच बाहेर उभे असलेल्या पो.काँ. बालाजी चव्हाण, माधव तोटेवाड यानी प्रसंगावधान दाखवत त्यांनी घराचा दरवाजा तोडायला सुरुवात केली मात्र तितक्याच सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. घर माळवदाचे असल्याने घराची पडझड झाली. या घटनेत ‘तो’ इसमही भाजल्याने गंभीर जखमी झाला आहे, त्याला अंबाजोगाई येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तसेच दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.





























































