
बुद्धिबळाचा राजा असलेल्या दोम्माराजु गुकेशने आठवडाभरातच जगात नंबर वन असलेल्या मॅग्नस कार्लसनच्या पराभवाचा वचपा काढला आणि आपल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला. मात्र त्याच्याकडून पराभवाचा धक्का बसताच कार्लसनला राग अनावर झाला अन् त्याने रागाच्या भरात बुद्धिबळाच्या टेबलवर थाप मारली. आपल्या देशातच जगज्जेत्याविरुद्धचा पहिला पराभव माजी जगज्जेत्या कार्लसनला पचला नाही. या प्रकारानंतर कार्लसनने गुकेशची माफी मागितली आणि तो तिथून निघून गेला. दुसरीकडे गुकेशला आपण जिंकलोय यावर विश्वासच बसत नव्हता आणि त्याने अत्यंत शातंपणे आपला आनंद व्यक्त केला. गुकेशचा हा विजय हा नव्या पर्वाची नांदी आहे.
वर्षभरात कालर्सनचा दुसरा पराभव
बुद्धिबळ जगतातील अत्यंत प्रतिष्ठेच्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत हिंदुस्थानच्या दोन युवा खेळाडूंनी कार्लसनला नमवण्याचा पराक्रम केला. बरोबर वर्षभरापूर्वी प्रज्ञानंदानेही कार्लसनला पराभूत केले होते. मात्र आजचा पराभव कार्लसनच्या जिव्हारी लागला. अत्यंत थरारक वळणावर असलेल्या या डावात कार्लसनच्या बुद्धिकौशल्याने गुकेशविरुद्ध चांगलीच आघाडी घेत सामन्यावर आपले नियंत्रण राखले होते. परंतु शेवटच्या काही चालींमध्ये कार्लसनकडून झालेल्या चुका त्याला चांगल्याच महागात पडल्या. त्यामुळे गुकेशने चुकांचा लाभ उठवत त्यालाही खुर्चीवरून उठायला भाग पाडले. शेवटपर्यंत शांत आणि संयमाने खेळत असलेल्या गुकेशने 62 व्या चालीवर कार्लसनला मात दिली.
मीसुद्धा अनेकदा टेबल्स तोडली आहेत
गुकेशने पराभवानंतरच्या कार्लसनच्या रागाबाबत अत्यंत सौम्य प्रतिक्रिया व्यक्त करत आपणही अनेकदा पराभवानंतर अशी टेबल्स तोडली आहेत. यात काही नवल नाही. आजचा सामना मी जवळजवळ हरलोच होतो. 100 पैकी मी 99 वेळा हरलोच असतो; पण तो एक क्षण माझ्यासाठी भाग्यशाली ठरल्याची प्रतिक्रिया गुकेशने व्यक्त केली.