
शीव येथील डी.एस. हायस्कूलच्या तब्बल 40 विद्यार्थ्यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने दिली जाणारी राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षे म्हणजे नववी ते बारावीपर्यंत दरवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये मिळणार आहेत. कोरोना संकट काळात आर्थिक ओढाताणीमुळे कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गळतीचे प्रमाण वाढत असताना शिव शिक्षण संस्थेच्या डी.एस. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांची गळती रोखून त्यांच्यातील हुशार विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱया राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) राबवली जाते. या स्पर्धा परीक्षेत डी.एस. हायस्कूलच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठीची ‘एनएमएमएस’ स्पर्धा परीक्षा मे 2021 मध्ये पार पडली. या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शाळेने वर्षभर ऑनलाइन तसेच ऑफलाइन असे विशेष अभ्यास वर्ग आयोजित केले होते. आठवीच्या विद्यार्थ्यांकडून बुद्धिमत्ता चाचणी (‘मॅट’ ः मेंटल ऑबिलिटी टेस्ट) आणि विषयांश चाचणी (‘सॅट’ – सब्जेक्ट ऑबिलिटी टेस्ट) या दोन्ही पेपर्ससाठी नियमित सराव करून घेतला जात होता. अनुदानित शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखाहून कमी असते, असे आठवीतील विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी ही स्पर्धा परीक्षा देतात. शाळेतील शिक्षक डॉ. संजय मोहिते यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांची नियमित तयारी करून घेण्यात आली.
आतापर्यंत शाळेच्या 600 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शाळेतील बहुतांश विद्यार्थी हे धारावी-चुनाभट्टी येथील कष्टकरी कुटुंबातील असल्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी शाळा दरवर्षी विशेष प्रयत्न घेते, असे डी.एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले. ही शिष्यवृत्ती सुरू झाल्यापासून गेल्या 13 वर्षांत शाळेच्या तब्बल 600 विद्यार्थ्यांनी ती मिळवली आहे. वार्षिक 12 हजारांच्या या शिष्यवृत्तीमुळे पालकांवरील शैक्षणिक भार निश्चितच कमी होण्यास मदत होते, असेही प्रधान म्हणाले.































































