
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक असलेल्या दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी जामिनाकरिता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राज्य सरकारने या याचिकेवर उत्तर देण्यासाठी अवधी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयात या याचिकेवर आता 19 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
सुमारे 2 हजार 43 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी बांधकाम व्यवसायिक डीएसकेंना अटक करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून ते तुरुंगात असून ऑगस्ट 2018 साली त्यांच्याविरोधात चार्जशिट दाखल करण्यात आली आहे. असे असतानाही खटल्याला अद्याप सुरुवात न झाल्याने डीएसके यांनी सर्वोच्च न्यायालयात ऍड. रितेश येवलेकर व ऍड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे.
या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरकारी वकिलांनी याचिकेवर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी मागितला. सर्वोच्च न्यायालयाने मुदत देत या याचिकेवर 19 एप्रिल रोजी सुनावणी ठेवली.




























































