डबेवाल्यांवर उपासमारीची वेळ, महिन्याला तीन हजार रुपयांची मदत देण्याची केंद्राकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईचे मॅनेजमेंट गुरू म्हणून ओळख असलेले मुंबईच्या डबेवाल्यांसमोर चिंतेचे ढग आता गडद होऊ लागले आहेत. कधीही न थांबणारी डबेवाल्यांची सेवा कोरोनामुळे थांबली आणि त्यांच्या अखंड सेवेला स्वल्पविराम लागला. गेल्या साडेपाच महिन्यांपासून मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद असल्याने आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चिंतेत असणाऱ्य़ा डबेवाल्यांनी केंद्र सरकारकडे साकडे घातले असून बंद असलेली लोकल सेवा सुरू करा, अन्यथा मुंबईच्या डबेवाल्यांना महिना तीन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा बंद झाली. सध्या लॉकडाऊनच्या नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणण्यात आलेली आहे. परिणामी मुंबईत अनेक ठिकाणी सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या कर्मचारी वर्गांकडून डबेवाल्यांकडे त्यांच्या सेवेसाठी विचारणा करण्यात येत आहे. मात्र लोकलसेवा सुरू नसल्याने डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या साडेपाच महिन्यांपासून बंद असलेली सेवा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे डबेवाल्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मॅनेजमेंट गुरू म्हणून नावलौकिक असणाऱ्य़ा या डबेवाल्यांसमोर आर्थिक चणचण निर्माण झालेली आहे.

आता डबेवाल्यांची जगायचे कसे? हा त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे हळूहळू करून आमची सेवा सुरू करण्याची मुभा आम्हाला द्यावी, असे मत मुंबई डबेवाले असोसिएशनचे सुभाष तळेकर यांनी यावेळी व्यक्त केले. सध्याची परिस्थिती लक्षात घेता डबेवाल्यांना जगणे मुश्कील झाले आहे. लोकल सेवेबाबत केंद्र सरकार निर्णय घेत नाहीत. त्यामुळे आम्ही केंद्राकडे अनुदान देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अत्यावश्यक सेवेमध्ये डबेवाल्यांचा समावेश करा

जोपर्यंत मुंबईतील लोकलमध्ये डबेवाल्यांना प्रवेश मिळत नाही तोपर्यंत मुंबईच्या डबेवाल्यांना आपली सेवा सुरू करता येणार नसल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दै. ‘सामना’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये मुंबईच्या डबेवाल्यांचा समावेश करून त्यांची सेवा सुरू करण्यास प्राधान्य देण्याची मागणी तळेकर यांनी यावेळी केली.

मुंबईतील लोकल सेवा बहाल करण्यात यावी. मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशीच डबेवाल्यांची लाईफलाईन लोकलच आहे. जोपर्यंत लोकल सेवा पूर्णपणे बहाल होत नाही तोपर्यंत तरी डबेवाल्यांना आपली सेवा देणे शक्य नाही. त्यामुळे आता डबेवाल्यांची अडचण झालेली आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. केंद्र सरकारने डबेवाल्यांना महिन्याला तीन हजार रुपये अनुदान द्यावे.  -सुभाष तळेकर,  अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन

 सायकलही गंजल्या

गेल्या साडेपाच महिन्यांपासून बंद असलेल्या डबेवाल्यांच्या सेवेमुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विविध रेल्वे स्टेशनजवळ डबेवाल्यांच्या सायकली पार्क करून ठेवलेल्या असतात. सध्या पावसामुळे या सर्व सायकली गंजल्या असून त्या आता निरुपयोगी झाल्या आहेत. त्यातच सेवा बंद असल्याने नव्या सायकल विकत घेण्याचा खर्च उचलणे डबेवाल्यांना शक्य नसल्याने डबेवाल्यांसमोर दुहेरी अडचण झाली आहे. त्यामुळे या सायकलींसाठी दानशूरांनी पुढे यावे, असे आवाहनही तळेकर यांनी यावेळी केले.