
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आज अखेर पाच आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आले. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर, सचिन अंदुरे, विक्रम भावे, अॅड. संजीव पुनाळेकर यांच्यावर विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी ही आरोपनिश्चिती केली. मात्र, आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितले. याप्रकरणाची सुनावणी आता 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल आठ वर्षांनंतर 7 सप्टेंबर रोजी पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या काळात कुटुंब आणि वकिलांना भेटता न आल्याने मुदतवाढ देण्याची मागणी आरोपींनी केली. त्यानुसार न्यायालयाने आजपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी आरोप निश्चित करण्यात आले.
आज व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली. यामध्ये वीरेंद्रसिंह तावडे येरवडा कारागृहातून, शरद कळसकर आर्थर रोड कारागृहातून, सचिन अंदुरे संभाजीनगर कारागृहातून उपस्थित होते. तर या प्रकरणात जामीन मिळालेले अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे न्यायालयात हजर होते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 ला हत्या झाली. आठ वर्षांनंतर सीबीआयने दाखल केलेल्या दोषारोपपत्रात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात कट रचणे, हत्या करणे, असे आरोप ठेवण्यात आले आहेत. तर अॅड. पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.





























































