
सामना प्रतिनिधी । मालवण
खैदा-कातवड येथील प्रतिभा ढोलम यांच्या बंद घराचे कुलूप फोडून कपाटातील ३० तोळे वजनाचे जुने व नवे सोन्याचे दागिने व ३ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण सुमारे नऊ लाख रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. घरफोडीची ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण शहरापासून अवघ्या ४ ते ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या खैदा कातवड गावात प्रतिभा ढोलम यांचे जुने घर आहे. मात्र सध्या त्या मालवण येथे नातवांसह भाड्याने राहतात. तर त्यांचा मुलगा प्रवीण हा महावितरणमध्ये कामास आहे. वर्षभरापूर्वी मालवण येथून त्यांची बदली कराड येथे झाली.
दसऱ्याला घरी आलेल्या प्रवीण व कुटुंबीयांनी कातवड येथील घरात दागिने ठेवले होते. त्यानंतर तो पुन्हा कामास कराड येथे गेला. तर आई प्रतिभा व प्रवीण यांची मुले मालवण येथे होती. सुट्टी असल्याने मालवणला आलेला प्रवीण शनिवारी सकाळी कातवड घरी परतला. त्याला घराचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. आतील कपाट फोडून सोन्याचे सर्व दागिने व कोटात ठेवलेले ३ हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसून आले. घरात चोरी झाल्याची माहिती प्रवीण याने स्थानिक ग्रामस्थांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अज्ञात चोरट्याने कपाटातील पाच सोनसाखळ्या, एक हार, दोन बांगड्या, एक अंगठी असे सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने तसेच कोटासह आतील ३ हजार रुपये असा सुमारे ९ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. चोरीबाबत तक्रार प्रतिभा ढोलम यांनी पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरटा माहितगार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, पोलिस उपनिरीक्षक सचिन पाटील, सुनील वेंगुर्लेकर, संतोष गलोले, योगेश जळवी, सिद्धेश चिपकर, अविनाश गायतोंडे, उज्ज्वला मांजरेकर, फ्रीडन भुतेलो आदी पोलिस कर्मचारी दाखल झाले. ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले.
आईचे १० तोळे मुलाचे २० तोळे दागिने
घरातील कपाटात एका डब्यात प्रतिभा यांचे सुमारे १० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. तर दुसऱ्या एका डब्यात मुलगा प्रवीण यांचे सुमारे २० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने होते. सर्व दागिने चोरट्यानी लंपास केले.



























































