मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा फटका, दादरमधील बेस्ट बसच्या मार्गांमध्ये बदल!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे अखेर वाहतूक पोलिसांनी दादर पश्चिम परिसरातील विविध मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले. तसेच बेस्ट बसच्या मार्गांमध्ये बदल केले. त्यामुळे खाजगी वाहनांसह सार्वजनिक वाहनांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दुपारी वाजल्यापासून दादर पश्चिमेतील विविध मार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद केले. त्यात भवानी शंकर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्ग क्रमांक 56, 88, 110, 151, 814, 164, 171, 201, 305, 128, 52 आणि 357 या बससेवा गोपीनाथ चव्हाण चौक येथून नामदार गोपाळ कृष्ण गोखले मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. या बस प्रबोधनकार ठाकरे चौक येथून उजवे वळण घेऊन राव बहादूर एस. के. बोले रोड, हनुमान मंदिर, एन. सी. केळकर रोडमार्गे नियोजित स्थळी सोडल्या जाणार आहेत.

सायंकाळी 4.50 वाजता वरळी आगार विभागातील एस. के. बोले रोड डाऊन दिशेला प्रबोधनकार ठाकरे चौकापर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मार्ग क्रमांक 63, 165, 169, 172, 351 आणि 385 या बससेवा डॉ. यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौक मार्गे भवानी शंकर रोडने गोपीनाथ चव्हाण चौक, काकासाहेब गाडगीळ मार्ग, शंकर घाणेकर मार्ग आणि स्वर्गीय एकनाथ ठाकूर चौक मार्गे अप्पासाहेब मराठे मार्गाने पुढे नियोजित मार्गावर धावणार आहेत. दरम्यान, दादर स्टेशनकडून डॉक्टर यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौक अर्थात कबूतरखाना येथे येणारा मो. ची. जावळे मार्ग वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मार्ग क्रमांक 118 ही बस दादर स्टेशन येथून डावे वळण घेऊन डी’सिल्वा रोडमार्गे विसावा हॉटेल येथे डावे वळण घेऊन एन. सी. केळकर रोडमार्गे पुढे नियोजित मार्गाने धावणार आहे.

सुधारित मार्गांची नोंद घेण्याचे प्रवाशांना आवाहन

एस. के. बोले रोड डाऊन दिशेला वाहतूक बंद केल्याने नव्याने सुरू करण्यात आलेला मार्ग क्रमांक 814 देखील परावर्तित करण्यात आला आहे. ही बस दादर स्टेशन येथून डी’सिल्वा रोड, विसावा हॉटेल, एन. सी. केळकर रोड, डॉक्टर यज्ञेश्वर विठ्ठल पुरंदरे चौक, भवानी शंकर रोड आणि गोपीनाथ चव्हाण चौक मार्गे यू-टर्न घेऊन नामदार गोपाळ कृष्ण गोखले रोड, प्रबोधनकार ठाकरे चौक, एस. के. बोले रोडमार्गे सिद्धिविनायककडे जाईल. वाहतूक कोंडीमुळे करण्यात आलेल्या या बदलांमुळे प्रवाशांनी बसच्या सुधारित मार्गांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन बेस्ट प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी केले आहे.