
विलेपार्ले येथे दहीहंडी पह्डत असतानाच सहाव्या थरावरून पडल्याने जखमी झालेल्या संदेश दळवी या तरुणाचा सोमवारी रात्री मृत्यू झाला होता. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी आयोजक रियाज मस्तान शेखला अटक केली. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
शुक्रवारी विलेपार्लेच्या बामनवाडा परिसरात दहीहंडीचे आयोजन केले होते. रात्री विलेपार्लेचे शिवशंभो गोविंदा पथक दहीहंडी फोड़ण्यासाठी आले होते. सहा थराचा मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. दहीहंडी फोडत असतानाच संदेश आणि विनायक रामवाडे हे दोघे थरावरून पडल्याने ते जखमी झाले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना सुरुवातीला सरकारी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती समजताच विलेपार्ले पोलीस घटनास्थळी गेले. दहीहंडी कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांनी सुरक्षेची उपाययोजना न ठेवल्याने विलेपार्ले पोलिसांनी आयोजक रियाज शेख विरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सकाळी संदेश दळवी याचे अंत्यदर्शन घेतले. त्याच्या कुटुंबीयांना धीर देऊन सरकारकडून संपूर्ण भरपाई मिळवून देऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. संदेश दळवी याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दहा लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. शिवसेना सदस्य अजय चौधरी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.































































