दहिसर, बोरिवली, मागाठाण्यातील पाणी प्रश्न सुटणार; निधीचा प्रस्ताव पाठवण्याचे विभागांना आदेश, शिवसेनेचा पाठपुरावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगरपालिकेच्या हद्दीमधील दहिसर, बोरिवली आणि मागाठाणे विभागात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील खड्डे-दुरवस्थेचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाकडून अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांची आज भेट घेण्यात आली. यानंतर पाणी समस्या सोडवावी आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधीचे प्रस्ताव पाठवावेत असे आदेश पी. वेलरासू यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मात्र दहिसर, बोरिवली आणि मागाठाणे विभागातील डोंगराळ, टेकडीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना अपुऱ्या पाणी पुरवठय़ाचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी पुढील आठ दिवसांत तातडीने कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, असे आदेश बैठकीत देण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिष्टमंडळाकडून अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना निवेदन देण्यात आले. यावेळी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, मागाठाणे विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, विधानसभा संघटक भास्कर खुरसुंगे, संजय सिंघण, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, रिद्धी खुरसुंगे, माधुरी भोईर, संध्या दोशी, विनायक सामंत, अभियांत्रिकी विशेष उपायुक्त कांडलकर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे, उपजल अभियंता संपत रावते, अंनत सोंडे, उपविभागप्रमुख राजू मुल्ला, योगेश भोईर, चेतन कदम, शाखाप्रमुख सुबोध माने, सचिन मोरे, विपुल दोषी उपस्थित होते.

तातडीने रस्तेदुरुस्ती करा

– मुंबईत रस्ते टिकावू आणि मजबूत बनवण्यासाठी सर्व रस्ते सिमेंटचे बनवण्याचे धोरण पालिका राबवत आहेत. मात्र हे सर्व रस्ते सिमेंटचे बनवण्यासाठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी जाणार आहेत. तोपर्यंत खड्डे आणि दुरुस्तीचा मनस्ताप बंद करण्यासाठी तातडीने खड्डे बुजवावेत, आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. यासाठी संबंधित विभागांना निधीचे प्रस्ताव तत्काळ पाठवण्याचे निर्देशही दिल्याचे त्यांनी सांगितले.