दहिसर, मागाठाणे, दिंडोशीमधील प्रकल्प बाधितांना उपनगरातच पर्यायी घरे द्या!

693
eknath-shinde

पश्चिम उपनगरामध्ये रस्ते, नदी रुंदीकरणाची विकासकामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची घरे या विकास प्रकल्पात बाधित झाली आहेत. त्यांना उपनगरामध्येच पर्यायी घरे उपलब्ध करून द्या, असे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले.

पश्चिम उपनगरात प्रकल्प बाधितांसाठी पर्यायी घरे उपलब्ध नसल्याने त्यांच्या स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज बैठक झाली. यामध्ये दहिसर नदी रुंदीकरणातील प्रकल्प बाधितांना तत्काळ मीरा-भाईंदर येथील एमएमआरडीएच्या प्रकल्पात तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी घरे उपलब्ध करून द्यावीत तसेच दहिसर, मागाठाणे, दिंडोशी येथील नदी व रस्ते रुंदीकरणातील प्रकल्प बाधितांसाठी मुंबई महापालिकेने स्वतः एमएमआरडीएप्रमाणे गृहनिर्माण योजना तयार करून तत्काळ अंमलबजावणी करावी, तसेच जोपर्यंत प्रकल्प बाधितांसाठी पश्चिम उपनगर परिमंडळ परिसरात कायमस्वरूपी घरे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश नगरविकासमंत्र्यांनी दिले आहेत. या बैठकीला शिवसेना विधिमंडळ पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, आमदार प्रकाश सुर्वे, एमएमआरडीएचे आयुक्त राजीव, माजी विभागप्रमुख प्रकाश कारकर, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, नगरसेविका सुजाता पाटेकर, नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद, हर्षद प्रकाश पाटेकर, उपायुक्त विश्वास शंकरवार, माजी नगरसेवक भास्कर खरसुंगे आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या