
सामना प्रतिनिधी, मुंबई
भुसावळ येथून ताबा घेतलेल्या आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाणाऱया दहिसर पोलिसांनी जुहू येथे रिक्षाचालकावर झालेल्या हल्ल्यातील वॉण्टेड आरोपींना पकडण्याची कामगिरी केली. रिक्षात घाबरलेल्या अवस्थेत बसून काहीतरी लपवाछपवी करीत असताना दोघे पोलिसांच्या नजरेस पडले आणि दहिसर पोलिसांच्या चाणाक्षपणामुळे जुहू येथील गुह्यातले आरोपी गजाआड झाले.
दहिसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. चंद्रकांत घार्गे आणि अंमलदार चंद्रकांत शिरसाट हे भुसावळ येथून ताबा घेऊन आलेल्या आरोपीस अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता जात असताना दोन इसम रिक्षातून संशयितरीत्या जात असलेले दिसले. पोलिसांनी त्या रिक्षाचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची नावे मोहम्मद अर्शद नसरुद्दीन अन्सारी (20) आणि नावेद मोहम्मद इलियास इद्रसी (18) अशी सांगितली. त्यांच्यापैकी अन्सारीच्या शर्टावर रक्ताचे डाग होते तर दुसरा घाबरलेला होता. त्यांची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक रक्ताने माखलेला फोल्डिंग बटणाचा चाकू तसेच एक विवो कंपनीचा स्मार्टफोन मिळाला.
उडवाउडवीची उत्तरे, मग कबुली
रक्ताने माखलेल्या चाकूबाबत तसेच मोबाईलबाबत त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोन पंचांसमक्ष पंचनामा करून त्यांचे ताब्यातील चाकू तसेच विवो कंपनीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने तसेच त्यांनी कुठेतरी गंभीर गुन्हा केले असल्याची दाट शक्यता वाटल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेव्हा चौकशीदरम्यान त्यांनी आलूवाडी, गुलमोहर रोड, अंधेरी पश्चिम या ठिकाणी जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली.
रिक्षाचालकावर हल्ला
जुहू पोलीस ठाणे संपर्क साधून चौकशी केल्यावर दोन अनोळखी इसमांनी एका रिक्षावाल्याला चाकूने छातीवर, डोक्यात आणि खांद्यावर असे तीन वार करून त्याच्याजवळील विवो कंपनीचा मोबाईल व पैसे जबरदस्तीने हिसकावून घेऊन पळून गेले असल्याबाबतची माहिती घार्गे यांना मिळाली. तो रिक्षाचालक राकेशकुमार रामनरेश गुप्ता (33) यास कूपर हॉस्पिटल येथे आंतर रुग्ण म्हणून दाखल केलेले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. ताब्यात आरोपी असतानाही घार्गे व शिरसाठ यांनी रिक्षाचालकावर हल्ला करून पसार झालेले दोन आरोपी पकडले.

























































