
रंगीबेरंगी छत्र्यांचा सेल्फी पॉइंट, रंगीबेरंगी दिवे आणि दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या आकर्षक आणि सामाजिक संदेश देणाऱया चित्रांमुळे परिसराचे रूपडे पालटले आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या निधीतून हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात आल्याचे शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
पश्चिम उपनगरचे शेवटचे टोक असलेल्या दहिसरची दहिसर नदी म्हणजे मुंबईचे वैभव आहे. मात्र गेल्या काही वर्षांत नदीचे स्वरूप बिघडल्याने गाळ काढणे, संरक्षक भिंती बांधणे, भिंतीवर आकर्षक चित्रे काढणे, स्वच्छता राखणे, आकर्षक विद्युत रोषणाई अशी कामे केली जात आहेत. तरुणांमध्ये सध्या सेल्फीची मोठी आवड निर्माण झालेली आहे. मात्र ही सेल्फी सुरक्षित ठरावी यासाठी रंगीबेरंगी छत्र्यांची सजावट असलेला सुरक्षित सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख-आमदार विलास पोतनीस, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, विनायक सामंत, अविनाश लाड यांच्यासह शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
संरक्षक भिंतीवर पर्यावरण रक्षणाचे संदेश
दहिसरमधील नागरिक नियमितपणे विपेंडला शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मरीन लाइन्सचा क्वीन नेकलेस पाहण्यासाठी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून दहिसर नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येत असल्याचे उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱया नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी सांगितले. दहिसर नदीच्या संरक्षक भिंतीवर रेखाटण्यात आलेल्या चित्रांमध्ये शैक्षणिक, सामाजिक संदेशासह पर्यावरण रक्षणाचा संदेश, प्राणी-पक्षी रेखाटल्याने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या.


























































