
कचरा व्यवस्थापनासाठी पालिका अनेक उपक्रम राबवून नागरिकांनाही प्रोत्साहन देत असताना दहिसरच्या ठाकूर कॉलेजनेही ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सुरू केली आहे. यासाठी 180 किलो कचऱ्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक यंत्रणा कॉलेजमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.
दहिसर पूर्व परिसरातील ‘ठाकूर रामनारायण कॉलेज ऑफ आर्टस् ऍण्ड कॉमर्स’ या महाविद्यालयातील उपाहारगृहात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून जैविकखत निर्मिती करणारी ‘टंब्लर’ पद्धतीची दोन यंत्रे नुकतीच कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या ‘आर उत्तर’ विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संचालक आणि नगरसेवक सागरसिंह ठाकूर, प्राचार्य, पालिकेच्या ‘परिमंडळ-7’चे उपायुक्त विश्वास शंकरवार, महाविद्यालय व्यवस्थापन प्रतिनिधी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी यांच्यासह मोठय़ा संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. होणारे खत हे साधारणपणे दर 30 दिवसांनी काढण्यात येणार आहे.
























































