दहिसरमधील वारकरी शिल्पाच्या तोडफोडीचा टाळ-मृदुंगाच्या गजराने निषेध

दहिसर पश्चिमच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील वाहतूक बेटावर शिवसेनेच्या माध्यमातून बनवलेल्या वारकरी शिल्पाची तोडफोड करणाऱया समाजकंटकांचा वारकऱयांनी टाळ गजर आणि भजन करून निषेध केला. तसेच शिल्पाची तोडफोड करणाऱया समाजकंटकांवर कारवाई करावी यासाठी पोलिसांना निवेदनही देण्यात आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळील वाहतूक बेटाचे सौंदर्यीकरण आणि वारकरी शिल्प शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या माध्यमातून केले आहे. मात्र गेल्या आठवडय़ात काही समाजकंटकांनी या शिल्पाची नासधूस केली. त्यामुळे यामागील सूत्रधार शोधावा, अशी मागणी नगसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.

दरम्यान, वारकऱयांच्या भावनांशी कुणी खेळल्यास त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशाराही वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी दिला आहे. या वेळी श्रीमंत माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनित सबनीस, नवी मुंबईचे विशाल महाराज फापाळे, वसई-विरारचे ढगे महाराज, शिवप्रतिष्ठान महाराष्ट्रचे विनीत सावंत, अनिकेत सावंत उपस्थित होते.