मराठवाड्यात प्रतिदिन 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यंदाही भीषण दुष्काळी परिस्थिती

457

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येसारखा शेवटचा मार्ग पत्कारत आहेत. सात महिन्यांच्या कार्यकाळात विभागातील 519 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, म्हणजेच प्रतिदिनी ३ शेतकरी आपली जीवनयात्रा संपवीत आहेत.

मराठवाडा विभागावर निसर्गाचा कोप झालेला आहे. अत्यल्प पावसामुळे शेती उत्पादनात लक्षणीय घट झाली आहे. काळ्या आईची ओटी भरून हाती काही लागत नाही. उलट डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रपंच भागविणेही शेतकऱ्यांना कठीण होत चालले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जाचा वाढता बोजा असह्य झाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत.

नवीन वर्षात मराठवाड्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कार्यकाळात 519 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्वाधिक 124 शेतकऱ्यांच्या आत्महत्या एकट्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. या जिल्ह्यापाठोपाठ संभाजीनगर 77 आणि धाराशिव जिल्ह्यात 76 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. विभागातील अन्य जिल्ह्यांत शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. जालना- 58, परभणी- 44, हिंगोली- 22, नांदेड- 64 आणि लातूर जिल्ह्यात 54 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. ही सर्व माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल उपायुक्तांनी राज्य शासनास दिली आहे.

97 आत्महत्या मदतीस अपात्र
आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसास चौकशीअंती एक लाखाची मदत दिली जाते. मराठवाड्यातील 519 आत्महत्येच्या घटनांपैकी 97 आत्महत्येच्या घटना शासन मदतीस अपात्र ठरविण्यात आल्या असून, 47 प्रकरणे चौकशीत प्रलंबित आहेत. शासनाने विभागातील 375 आत्महत्येच्या घटनांत 3 कोटी 67 लाख मदतीचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे. प्रलंबित 47 प्रकरणांची तातडीने चौकशी करून प्रकरणे निकाली काढावीत, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांतून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या